वक़्फचे 7.76 कोटी ₹ फसवणुकीच्या गुन्ह्यात मंडळाचे Dy CEO पठाण यांना...

वक़्फचे 7.76 कोटी ₹ फसवणुकीच्या गुन्ह्यात मंडळाचे Dy CEO पठाण यांना...

औरंगाबाद :महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या पुणे जिल्ह्यातील एका ट्रस्टला शासनाकडून जमीन अधिग्रहणाच्या भरपाईपोटी मिळणाऱ्या रकमेचा परस्पर अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला. तसेच यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची तसेच वक्फ मंडळाची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील दोघा जणांविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वक्फ मंडळाचे पुणे प्रादेशिक वक्फ अधिकारी खुसरो यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी इम्तियाज महम्मद हुसेन शेख आणि चांद रमजान मुलाणी  (दोघे रा. रामनगर, येरवडा, पुणे) यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या 420, 467,468, 469, 471या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी आपसात संगनमत करून स्वतःला ताबूत इनाम इंडोमेंट ट्रस्टचे (मौजे माण, ता. मुळशी, जि. पुणे)अध्यक्ष आणि सचिव असल्याचे भासवून या रकमेचा अपहार केला आहे.

ताबूत इनाम इंडोमेंट ट्रस्ट ही संस्था महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत आहे. या मंडळाकडील 7 हेक्टर 51 आर क्षेत्राची जमीन एमआयडीसी अधिनियमान्वये राजीव गांधी तंत्रज्ञान टप्पा क्रमांक चारसाठी शासनामार्फत अधिग्रहित करण्यात आली होती. यासाठी 9 कोटी 64 लाख रुपये इतकी निवाडा रक्कम मंजूर झाली होती. परंतु बरेच दिवस ही रक्कम न मिळाल्याने ट्रस्टने वक्फ मंडळाला तसे कळविले. पुणे प्रादेशिक वक्फ कार्यालयाकडून याची दखल घेऊन भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांचेकडे चौकशी करण्यात आली, त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.

इम्तियाज महम्मद हुसेन शेख आणि चांद रमजान मुलाणी या दोघांनी स्वतःला संबंधित ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव असल्याचे भासवून तसेच अल्पसंख्यक मंत्रालयातील डेस्क ऑफिसर तथा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे उपमुख्य कार्यकारी  अधिकारी पदाचा तात्पुरता अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे पठाण यांचे बनावट नाहरकत पत्र पुणे भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले. त्यानंतर या दोघांनी जमीन अधिग्रहणाच्या भरपाईपोटी मिळालेल्या 7 कोटी 76 लाख 98 हजार रुपये रकमेचा डिमांड ड्राफ्ट ट्रस्टच्या बँक खात्यावर जमा न करता तो वैयक्तिक बँक खात्यावर जमा केला आणि त्या माध्यमातून रकमेचा अपहार केला. तथापि, पुणे प्रादेशिक वक्फ कार्यालयाकडून उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र. 13, पुणे यांच्याकडे याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीची दखल न घेता उपजिल्हाधिकाऱ्यांकडून वक्फ कार्यालयाचा अर्ज फेटाळण्यात आल्याचेही पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

ही बाब लक्षात आल्यानंतर पुणे प्रादेशिक वक्फ अधिकारी खुसरो खान यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याची दखल घेत रकमेचा अपहार करणार्‍या शेख आणि मुलाणी या दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणात बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी अल्पसंख्यांक मंत्रालयातील डेस्क ऑफिसर तथा महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे उपकार्यकारी अधिकारी पदाचा तात्पुरता अतिरिक्त कारभार सांभाळणारे पठाण यांना पोलीस ठाण्यात तपास कामी पाचारण केले. आणि त्यांच्या सहीचा नमुना हस्ताक्षर घेण्यात आला. पठाण यांना पोलिसांनी तपासासाठी बोलावल्यामुळे औरंगाबादेत आज एकच अफवा पसरली कि, "या प्रकरणात एन ओ सी वर सही करण्यासाठी पंचवीस लाख रुपयाचा व्यवहार झालेला आहे म्हणून पोलिसांनी पठाण यांना अटक केली". याबाबत जनसत्ता कडून बंडगार्डन पोलीस स्टेशन मधून माहिती घेण्यात आली असता पठाण यांना फक्त त्यांच्या स्वाक्षरीचा नमुना घेण्यासाठी गुन्ह्याच्या तपासात पोलीस ठाण्यात पाचारण करण्यात आले होते. त्यांना अटक करण्यात आलेले नाही. अशी माहिती मिळाली.

सुत्रा कडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडून जी एन ओ सी देण्यात आली आहे त्याची जावक रजिस्टर मध्ये नोंद आहे.  मात्र त्यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बनावट सही कोणी केली हे अजून निष्पन्न झालेले नाही. वक्फ मंडळातीलच व्यक्तींचे हे कारस्थान असल्याचे समजते. पुणे पोलिसांची टीम सोमवारी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे कार्यालयात पुन्हा धडक देणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.