राज्यात वर्षभर २४ तास जमावबंदी असताना रात्रीच्या जमावबंदी आदेशाचे थोतांड कशाला?

राज्यात वर्षभर २४ तास जमावबंदी असताना रात्रीच्या जमावबंदी आदेशाचे थोतांड कशाला?

महाराष्ट्र राज्यात एक ही जिल्हा असा नसेल की त्या जिल्ह्यात  वर्षभर, २४ तास जमावबंदी लागू नसते. जिल्ह्याचे ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांचे मार्फत आणि पोलीस आयुक्तालयाचे ठिकाणी पोलीस आयुक्तांकडून दर १५-१५ दिवसांनी 'न चुकता' महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम ३७ चा आधार घेत असे जमावबंदीचे आदेश काढले जातात.  म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्रात बाराही महिने २४ तासासाठी जमावबंदीचे आदेश लागू असतात. जमावबंदीचे आदेश धुळकावणाऱ्या लोकांचे विरुद्ध प्रशासनाच्या 'सोईनुसार' गुन्हे दाखल केले जातात व कोर्टात खटलेही पाठविले जातात. 

असे असतांना कोरोना आणि ओमिक्रॉनच्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी आम्ही भलेमोठे 'कठोर' पाऊल उचलत असल्याचा आव आणून महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात २४ डिसेंबर पासून रात्री ०९०० वाजेपासून सकाळी ०६०० वाजेपर्यंत जमावबंदीचे (म्हणजेच ५ किंवा ५ पेक्षा जास्त लोकानी एकत्र येणे) आदेश लागू केले असल्याचे प्रसार माध्यमात आलेल्या बातम्यातून समजते. प्रसार माध्यमांकडून सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या या आदेशाचा मोठा गाजावाजा केला जात आहे.

प्रशासनाकडून संपूर्ण राज्यात वर्षभर,  २४ तास जमावबंदीचे आदेश असताना ऐन नाताळ सणाचे आणि नव वर्षाचे पूर्वी महाराष्ट्र शासनाला रात्री ०९०० वाजेपासून सकाळी ०६०० वाजेपर्यंत रात्रीची जमावबंदी चे आदेश काढल्याचे‌ थोतांड करण्याची काय गरज आहे? असा प्रश्न जाणकारांकडून उपस्थित केला जात आहे.