दहशतीची बॅग, संशयाचा रंग आणि वास्तवाचा धक्का!

दहशतीची बॅग, संशयाचा रंग आणि वास्तवाचा धक्का!

        भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय केनेकर यांच्या छत्रपती संभाजी नगरातील संपर्क कार्यालयात गुरुवारी रात्री ठेवलेली एक बॅग आणि त्यातून सापडलेली एअर पिस्टल… शुक्रवारी सकाळी उडालेली धांदल… आमदार संजय केनेकर यांची तातडीची एन्ट्री… पोलिसांपूर्वी पोहोचलेले पत्रकार… आणि कॅमेऱ्यासमोर सुरू झालेला आरोपांचा राजकीय खेळ!
घटना साधी होती — बॅग कोणी ठेवली हे माहीत नव्हते. पण उत्तर देताना थेट ‘गौवंश हत्या’, ‘लव्ह जिहाद’चा उल्लेख करत संशयाचा बाण एका विशिष्ट समाजाकडे वळवला गेला. प्रश्न बॅगेबद्दल होता, उत्तर मात्र राजकीय भूमिकांबद्दल दिले गेले. दहशतीचा दावा झाला, पण पुराव्याची वाट न पाहता वातावरण तापवले गेले.

         खरं तर कार्यालयात सीसीटीव्ही आहे, पोलिस तपास करणारच होते. थोडा संयम ठेवून “आरोपी सापडल्यानंतर बोलेन” असं म्हणणं अपेक्षित होतं. पण आधीच कथानक तयार करण्यात आलं — “मला दहशतीखाली आणण्याचा प्रयत्न”.

         राजकारणात विरोधकांवर टीका असते, भूमिका असतात; पण तपासाआधी समाजावर संशय टाकणे ही जबाबदार लोकप्रतिनिधीची भाषा असते का?

       पोलिस आले, बॅग जप्त झाली, तपास सुरू झाला… आणि सत्य बाहेर आलं. आरोपी मुस्लिम निघाला नाही. तो स्थानिक मुस्लिमेतर युवक निघाला — रितेश संतोष होळकर. म्हणजे दहशतवादाचा रंग देण्यात आलेली घटना प्रत्यक्षात बेदरकार कृत्य ठरली.

        गुन्हा दाखल झाला तोही आमदारांच्या तक्रारीवर नाही, तर पोलिस हेड कॉन्स्टेबल भास्कर नरवडे यांच्या फिर्यादीवर. लागू झालं बीएनएस कलम १२५ — मानवी जीव धोक्यात येईल अशा बेफिकीर कृत्यासाठीचं किरकोळ कलम.

     इथेच खरा प्रश्न उभा राहतो —ज्या घटनेला स्वतः आमदारांनी “दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न” म्हटलं, त्यावर मग कठोर दहशतवादविरोधी कायद्याचं  कलम १६ का  लावले गेले नाही? आणि उलट आरोपी एखाद्या मुस्लिम समाजातील असता तर कलमांची निवड अशीच झाली असती का?

       माध्यमांचंही चित्र वेगळं नाही. आरोप झाले तेव्हा लाईव्ह, ब्रेकिंग, चर्चांचा पाऊस. पण आरोपी सापडल्यानंतर तेवढ्याच ताकदीने “सत्य” दाखवलं गेलं का? राजकीय भाषणात संशयाचा धूर पटकन उठतो, पण सत्य समोर आलं की शांतता का पसरते?

       ही घटना एका बॅगेची नाही; ही आहे मानसिकतेची. पुराव्याआधी निष्कर्ष काढण्याची, समाजाला लक्ष्य करून सहानुभूती मिळवण्याची आणि नंतर वास्तव समोर आलं की विषय बदलण्याची.

        लोकप्रतिनिधींच्या शब्दांना वजन असतं. त्या शब्दांनी दहशत पसरू शकते, तणाव वाढू शकतो किंवा विश्वास निर्माण होऊ शकतो.
प्रश्न एवढाच — आपण पुराव्याच्या राजकारणात जगणार की संशयाच्या?

        क्रांती चौकातील बॅगने एअर पिस्टलपेक्षा मोठा आवाज केला — तो म्हणजे सत्य आणि आरोप यांच्यातला फरक दाखवणारा!