भोगा, तुमच्या पापांचे फळ.....

भोगा, तुमच्या पापांचे फळ.....
Rakhi Sawant

कोरोना’ विषाणूचा संसर्ग जगभरात झालेला असून प्रत्येक देश आपापल्या नागरिकांना त्यापासून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. ‘कोरोना’बद्दल अनेक तर्क -वितर्क आणि अफवाही पसरविल्या जात आहेत. त्यात आयटम गर्ल राखी सावंत हिची भर पडली असून ‘लोकांनी केलेल्या पापांमुळे ‘कोरोना’ व्हायरस आला आहे’, असे तिने म्हटले आहे. राखीने याबाबतचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अभिनेत्री राखी सावंत फार काळ चर्चेत नाही असे होऊच शकत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा तिने केलेल्या सोशल मीडियातील एका पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. तिने यावेळी ‘कोरोना’ संदर्भातला व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत ती ‘कोरोना’वर भाष्य करताना दिसते.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओत राखी म्हणते, ‘लोकांनी केलेल्या पापांचे फळ म्हणजेच ‘कोरोना’…. या कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘कोरोना’पासून बचाव करण्यासाठी हात – पाय धुवा, डोके धुवा, तोंड धुवा…असे सगळेजण सांगत आहेत. पण तुमच्या आत्म्याचे काय? तो कसा काय धुतला जाणार?

आपण सर्वांनीच खूप पापे केली आहेत. हा कोरोना व्हायरस सर्वांना धडा शिकवायला आला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, देवाला शरण जा. केलेल्या पापांची माफी मागा. असे केले तर मला खात्री आहे, तुम्हाला कोरोनाची बाधा कधीही होणार नाही, असे राखीने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.