ड्रेनेजचा कहर! संजय नगर–बायजीपुऱ्यात दुषित पाणी रस्त्यावर, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
छत्रपती संभाजी नगर, १५ डिसेंबर: छत्रपती संभाजीनगर :शहरातील संजय नगर–बायजीपुरा परिसरातील गल्ली नंबर सी-१५ मध्ये ड्रेनेजची गंभीर समस्या निर्माण झाली असून, येथील सत्तार यांच्या घरासमोरुन बाहेर पडणारे दुषित ड्रेनेजचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. या घाणेरड्या पाण्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या गल्लीत लहान मुले, महिला तसेच वृद्ध नागरिक मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या झोन क्रमांक ३ मधील अधिकाऱ्यांनी पूर्णपणे कानाडोळा केला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
या ड्रेनेजमधील घाण रस्त्यावर साचून राहात असल्याने ये-जा करणे कठीण झाले आहे. दुर्गंधीमुळे घरात बसणेही अशक्य झाले आहे. अनेक वेळा महानगरपालिकेकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. साफसफाई होत नसल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे.
सध्या महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू असून लोकप्रतिनिधी नाहीत. नगरसेवकांची निवडणूक काही दिवसांत होणार आहे. अशा परिस्थितीत नगरसेवकपदासाठी इच्छुक उमेदवारांनी तरी या गल्लीकडे लक्ष द्यावे आणि नागरिकांची समस्या तातडीने सोडवावी, अशी ठाम मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
“जो उमेदवार आमच्या गल्लीतली ही ड्रेनेजची समस्या कायमची सोडवेल, त्यालाच आम्ही मतदान करू,” असा इशाराच नागरिकांनी दिला आहे.
प्रशासन झोपेत असताना नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबवणार कोण? असा संतप्त सवाल आता संजय नगर–बायजीपुरातील नागरिक विचारत आहेत.