औरंगाबादेत नकली नोटांचे छापखान्यावर पोलीसांचा छापा

औरंगाबादेत नकली नोटांचे छापखान्यावर पोलीसांचा छापा

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात नकली नोटा छापून औरंगाबाद शहरातच चलनात आणणाऱ्या टोळीला पुंडलिक नगर पोलीसांनी जेरबंद केले. नकली नोटा छापणारे आणि चलनात आणणारे एकूण पाच गुन्हेगारांना पकडण्यात आले असून त्यांचेकडून 500, 100 आणि 50 रुपये दराच्या सुमारे  1,20,000/-  रुपयाच्या नकली नोटा जप्त केल्या आहेत.

पोलीस स्टेशन पुंडलिक नगर चे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांना सोमवारी त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली की काही लोक त्यांच्या हद्दीतील सुपर वाईन शॉप नावाच्या दुकानात नकली नोटा देऊन दारू खरिदी करतात. अशी माहिती मिळाल्यावरून मंगळवारी पोलीस निरीक्षक गांगुर्डे यांनी त्यांचे अधिनस्त सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. खटाने यांना सापळा लावून कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक खटाने यांनी सहाय्यक फौजदार रमेश सांगळे, बाळाराम चौरे, गणेश डोईफोडे, गणेश वैराळकर, जालिंदर मांटे, संतोष पारधे, दीपक जाधव, राजेश यदमळ, कल्याण निकम, प्रवीण मुळे, रज्जूसिंग सुलाने, अजय कांबळे, कोमल तारे, प्रशांत भगरे यांचेसह मंगळवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास खबर्‍याने दिलेल्या माहितीनुसार नकली नोटा चलनात आणणारा रघुनाथ ढवळपुरे यास ताब्यात घेतले.

रघुनाथ ढवळपुरे याचे कडून सहाय्यक पोलीस निरीक्षक खटाने यांना माहिती मिळाली की पोलीस स्टेशन पुंडलिक नगर येथील रेकॉर्डवरील नकली नोटा छापणारा गुन्हेगार जो सन 2019 च्या गुन्ह्यातून सद्या जामिनावर सुटलेला आहे तो समरान उर्फ लक्की रशीद शेख हा त्याचा साथीदार नितीन चौधरी याच्या मदतीने मुकुंदवाडी येथे भाड्याने घर घेऊन त्या ठिकाणी नकली नोटा तयार करतो व त्या नोटा अक्षय अण्णासाहेब पडूळ व दादाराव पोपटराव गावडे यांच्या मार्फतीने औरंगाबाद शहरात चालवण्यासाठी विक्री करतो. या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव खटाने व त्यांच्या पथकाने छापा मारून आरोपी नामे (1) समरान उर्फ लक्की रशीद शेख, (30 वर्ष) राहणार जसवंतपुरा, नेहरू नगर, औरंगाबाद (2) नितीन कल्याणराव चौधरी वय 25 वर्ष राहणार मुकुंदवाडी, औरंगाबाद (3) अक्षय अण्णासाहेब वय 28 वर्षे, राहणार गजानन नगर, गल्ली नंबर 1, औरंगाबाद आणि (4) दादाराव पोपटराव गावडे 42 वर्ष राहणार गजानन नगर, गल्ली नंबर 1, औरंगाबाद यांना पकडले. त्यांच्या ताब्यातून 500, 100, 50 रुपये दराच्या नकली चलनी नोटा सुमारी 1,20,000/- रुपयाच्या जप्त केल्या. तसेच नकली नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य; कम्प्युटर, ऑल इन वन प्रिंटर, कटर, कागद असा ऐवज जप्त केला. तसेच तयार केलेल्या नकली नोटा वाहतूक करण्यासाठी वापरलेले वाहन महिंद्रा लोगन कार आणि संपर्कासाठी वापरत असलेले पाच मोबाईल फोन असा एकूण 3 लाख 10 हजार 390 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला.

सर्व पाचही आरोपींचे विरुद्ध पोलीस स्टेशन पुंडलिक नगर येथे अपराध क्रमांक 509/2021 भारतीय दंड विधानाचे कलम 489A, 489B, 489C, 489D, 420, 120B गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याची एफ. आय. आर. सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव खटाने यांचे ऐवजी पोलीस अंमलदार गणेश डोईफोडे यांनी दिली.

आरोपी समरान उर्फ लक्की रशीद शेख हा पोलीसांच्या रेकॉर्डवरील उच्चशिक्षित सराईत गुन्हेगार असून तो चलनात असलेल्या खऱ्या नोटा स्टॅंडर्ड कागदावर प्रिंटर द्वारे स्कॅन करून त्याची प्रिंट काढून कटर व स्केल च्या सहाय्याने हुबेहूब दिसणारी नकली नोट तयार करण्यात पटाईत आहे. यावेळी त्याने नवीन साथीदारांची निवड करून त्यांना प्रशिक्षित करून नवीन टोळी तयार केली आहे.

ही सर्व कामगिरी औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर निखील गुप्ता, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 दीपक गिरहे, सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपुरा विभाग विशाल ढुंमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी त्यांचे अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसह केल्याच एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.