घंटागाडी गायब, कचऱ्याचे साम्राज्य कायम! कार्तिक नगरात महानगरपालिकेचा निष्क्रिय कारभार उघड

छत्रपती संभाजी नगर, २९ मार्च: छत्रपती संभाजीनगर शहरातील मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याचे आणखी एक धक्कादायक उदाहरण कार्तिक नगर, पिसादेवी रोड परिसरात समोर आले आहे. पाच सहा वर्षांपासून येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांना आजही कच्च्या रस्त्यावरूनच मार्ग काढावा लागत असून, महानगरपालिकेच्या निष्क्रिय कारभारामुळे परिसरातील रहिवाशांचे जगणे अक्षरशः हालाखीचे झाले आहे.

      पावसाळ्यात या भागातील परिस्थिती अधिकच बिकट बनते. रस्ता नसल्यामुळे पायदळ चालणेही कठीण होते, तर दुचाकी आणि चारचाकी वाहने घरातच बंद ठेवावी लागतात. एवढ्यावरच ही समस्या थांबत नाही. गटारासाठी पाईपलाईन टाकण्यात आली असली तरी ती अद्याप मुख्य लाईनला जोडण्यात आलेली नाही. परिणामी सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनत असून नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.

      याशिवाय, एलपीजी गॅसची पाईपलाईन प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यात आली, मात्र प्रत्यक्ष जोडणीच करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘काम पूर्ण’ दाखवण्याच्या नावाखाली केवळ दिखाऊ विकास केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

      मात्र, सर्वात गंभीर आणि संतापजनक बाब म्हणजे कचरा व्यवस्थापनाचा पूर्णतः बोजवारा उडालेला आहे. महानगरपालिकेची घंटागाडी या भागात नियमित येत नसून, कधी १५ दिवसांनी तर कधी महिन्याने दर्शन देते. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने कचरा मुख्य रस्त्याच्या कडेला टाकावा लागत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी, प्रदूषण आणि अस्वच्छता निर्माण होत असून शहराच्या सौंदर्यावरही परिणाम होत आहे. ‘स्वच्छ शहर’च्या घोषणा देणाऱ्या प्रशासनाची ही स्थिती पाहता, त्या घोषणा केवळ कागदावरच असल्याचे स्पष्ट होत आहे.

      महानगरपालिकेच्या या ढिसाळ आणि बेफिकीर कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असताना अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

      याचबरोबर, या परिसरातील वीज व प्रकाशयोजनाही अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. इस्टेट लाईटची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने संपूर्ण परिसर रात्री अंधाराच्या विळख्यात जातो. नागरिकांना जीव मुठीत धरून अंधारातून रस्ता पार करावा लागत असून, अपघात व गुन्हेगारीच्या घटनांचा धोका वाढला आहे. महानगरपालिकेच्या या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

      या सर्व समस्यांकडे तात्काळ लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वी रस्ता, गटार, गॅस जोडणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियमित कचरा संकलनाची व्यवस्था सुरळीत करण्यात यावी, अशी मागणी कार्तिक नगर येथील रहिवासी तसेच BAMCEF चे वरिष्ठ पदाधिकारी हिम्मतराव तुकाराम सावंग यांनी केली आहे. अन्यथा नागरिकांना तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.