बाणेर वक्फ जमीन प्रकरणात गोंधळ फोल! – कायद्यानुसारच झाली विक्री : समीर काझी

छत्रपती संभाजीनगर, – पुण्यातील बाणेर परिसरातील वक्फ मालमत्तेच्या विक्रीप्रकरणी काही गैरसमज पसरवले जात असल्याचे वक्फ मंडळाने स्पष्ट केले आहे. याबाबत कोणत्याही सक्षम न्यायालयाने विक्री करार रद्द केलेला नाही किंवा त्यावर स्थगिती दिलेली नाही, अशी माहिती वक्फ मंडळाचे चेअरमन समीर काजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बाणेर (तालुका हवेली) येथील सर्वे नं. ९१/१ या जागेवरील ७ हेक्टर १४ आर इतकी वक्फ मालमत्ता, वक्फ मंडळाच्या मान्यतेने सन २००९ मध्ये विकण्यात आली होती. बाणेर मस्जिद या वक्फ संस्थेची नोंदणी 2005 साली झाली होती आणि 2009 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलेल्या बाजारभावानुसार 9.51 कोटी रुपयांना ती मालमत्ता विकण्यात आली होती. संपूर्ण रक्कम संबंधित मशिदीच्या खात्यावर जमा करण्यात आली होती.
या विक्रीसाठी त्या वेळी लागू असलेल्या वक्फ अधिनियम 1995 चे कलम 32 (2)(j) अन्वये वक्फ मंडळास स्थावर मालमत्ता विक्री, हस्तांतरण, बक्षीस किंवा भाड्याने देण्यासाठी मंजुरी देण्याचा अधिकार होता, पण 2013 मध्ये या कायद्यात झालेल्या दुरुस्तीनंतर विक्री, बक्षीस आणि हस्तांतरण करण्यासाठी परवानगी देण्याच अधिकार काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे 2013 पूर्वी झालेली ही विक्री पूर्णपणे कायदेशीर असून कोणतेही नियमभंग झालेला नाही.
वक्फ मंडळाचे चेअरमन समीर काझी म्हणाले, "जर कोणाला या व्यवहाराबद्दल आक्षेप असेल, तर त्यांनी थेट न्यायालयात जावे. केवळ वक्फ मंडळाची बदनामी करणे अयोग्य आहे."
या पत्रकार परिषदेला वक्फ मंडळाचे सदस्य अॅॅड ईफ्तेखार हाश्मी, अॅड. अहमद खान पठाण, हसनैन शाकीर, मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुशीर अहमद आदी मान्यवर उपस्थित होते.