अमरावतीचे रत्न आता देशाचे भूषण

विदर्भाची सांस्कृतिक राजधानी अमरावती जिल्हा नररत्नांची खाण आहे. या खाणीतून निघालेले आणि याच मातीत घडलेले अस्सल रत्न म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे होय. न्यायमूर्ती भूषण गवई आज 14 मे रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत. देशातील कोट्यवधी जनतेच्या न्यायदानाची धुरा खांद्यावर घेण्यासाठी सज्ज झालेले न्यायमूर्ती भूषण गवई हे केवळ अमरावतीसाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी भूषण आहेत.
न्यायमूर्ती भूषण गवई हे आंबेडकरी चळवळीचे अर्ध्वयू, बिहार, सिक्कीम आणि केरळचे राज्यपाल दिवंगत रामकृष्ण उपाख्य दादासाहेब गवई यांचे ज्येष्ठ सूूपूत्र होय. न्या. भूषण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 ला अमरावतीत डॉ. गोगटे यांच्या प्रसूतीगृहात झाला. कुटुंबात ते सर्वात ज्येष्ठ आहेत. आई माजी प्राचार्या डॉ. कमलताई गवई, बंधू डॉ. राजेंद्र गवई आणि धाकटी बाहिण कीर्ती अर्जुन गवई, असे त्यांचे मर्यादीत कुटुंब आहे. आंबेडकरी कुटुंब म्हणून विचार करता त्याचा देशभर विस्तार आहे. रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे मूळगाव दारापूर (ता.दर्यापूर) आहे. दादासाहेब गवई यांचे कुटुंब हे पूर्वी अमरावतीच्या फ्रेजरपुरा येथे वास्तव्यास होते. भूषण गवई यांचे तिसरीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण फ्रेजरपुरालगतच्या श्यामनगर येथील अमरावती महापालिकेच्या शाळेत, तीसरी ते सहावीपर्यंतचे शिक्षण चिकीत्स समूह मुंबई येथे, सातवीपासून दहावीपर्यंतचे शिक्षण कुलाबास्थित होलि नेम या इंग्रजी शाळेत तसेच अकरावी, बारावीपर्यंतचे शिक्षण मु्ंबईतील एचआर कॉलेजमध्ये झाले. वडील दादासाहेब गवई यांचा भारतीय संविधानाविषयी दांडगा अभ्यास होता. त्याचा प्रभाव भूषण गवई यांच्यावर होता. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी विधी शाखेची पदवी घेऊन त्यात करिअर करण्याचा निर्णय घेतला. विधी शाखेचे मुंबई येथे दोन वर्ष आणि अमरावतीत डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात अंतिम वर्षाचे शिक्षण घेतले. त्यांनी विधी शाखेत अमरावती विद्यापीठातून सुवर्ण पदक पटकावले. 1985 मध्ये ते अमरावती जिल्हा वकील संघाचे सदस्य झाले. बॅरिस्टर राजा भोसले यांच्या मार्गदर्शनात मुंबई उच्च न्यायालयात व तेथून अवघ्या दोन वर्षात पुढील तीन वर्ष स्वतंत्र प्रॅक्टीस सुरू केली आणि ते नागपूरला स्थायिक झालेत. यादरम्यान त्यांनी विविध खटले लढवून चुणूक दाखविली. नागपूर, अमरावती महापालिका व विद्यापीठाच्या पॅनलवर त्यांनी सेवा दिली. नव्वदचे दशक त्यांच्यासाठी टर्निंग प्वाइंट ठरले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी पब्लिक प्रॉस्यूक्यूटर म्हणून सेवा दिली. वकिली व्यवसायापेक्षा त्यांचा जास्त ओढा प्रत्यक्ष न्यायदानाच्या भूमिकेकडे अधिक होता. अत्यंत संयमी, विनम्र स्वभावाचे भूषण गवई यांनी त्या दृष्टीने प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नाला यशही मिळाले. 2003 मध्ये त्यांची नियुक्ती उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर, औरंगाबाद, गोवा, मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी न्यायमूर्ती म्हणून तब्बल 16 वर्ष सेवा दिली. त्यांचा खटल्याकडे पाहण्याचा व्यापक दृष्टीकोन, कायदेविषयक ज्ञान व प्रगल्भता तसेच सामाजिक दृष्टीकोन इत्यादी कसोटींवर 23 मे 2019 ला त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून झाली आणि अमरावतीचे नाव पुन्हा एकदा देशाच्या यशोशिखरावर पोहोचले. आता तब्बल सहा वर्षानंतर म्हणजेच 6 मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू या न्यायमूर्ती भूषण गवई यांना आज 14 मे रोजी पदाची शपथ देतील. तत्क्षणी, न्यायमूर्ती भूषण गवई हे भारताचे 52 वे मुख्य न्यायाधीश म्हणून देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होतील, हा क्षण अमरावती, महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याच्या घटनेपासून तर आतापर्यंतचा सुवर्ण अक्षरांनी नोंदवावा, असा ऐतिहासिक स्वरूपाचा आहे. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या रुपाने अमरावतीच्या सुपूत्राला देशाचे सर्वोच्च पद मिळत आहे. अमरावतीच्या शिरपेचात या घटनेने मानाचा तुरा खोवला जात आहे. त्यांच्या निवडीने प्रत्येक मराठी माणूस गौरवांकित झालेला दिसत आहे. डॉ. कमलताई गवई, डॉ. राजेंद्र गवई, कृतिका राजेंद्र गवई, कीर्ती अर्जुन गवई आदी कुटुंबीय हा ऐतिहासिक क्षण डोळ्यात साठविण्यासाठी दिल्लीकडे रवाना झालेले आहेत.
नररत्नाची खाण असलेल्या अमरावतीच्या मातीत घडलेला हिरा येथून पुढे आता देशसेवेला वाहून घेणार आहे. ही अमरावतीकरांसाठी अत्यंत भूषणावह बाब आहे. दर्यापूर तालुक्याच्या मातीची किमया काही न्यारीच राहिलेली आहे. रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई (रा. दारापूर, ता. दर्यापूर) यांनी नावलौकीक मिळविला. आता तोच वसा व वारसा न्यायमूर्ती भूषण गवई पुढे नेत आहेत. प्रतिभाताई पाटील-शेखावत यांच्या रुपाने देशाचे सर्वोच्च राष्ट्रपतीपद अमरावतीला मिळाले होते. शेखावत कुटुंब चंद्रपूर-खल्लार (ता. दर्यापूर, जि. अमरावती) येथील आहे. यापूर्वी दर्यापूर तालुक्यातील सखाराम महाजन, देशपांडे, विजय मुन्शी यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून सेवा दिलेली आहे. मधुकरराव कोकाटे (येवदा, ता. दर्यापूर), व्ही. एन. देशमुख (शिवर, ता. दर्यापूर) यांनी सनदी सेवेनंतर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्षपद तर पद्मश्री सुखदेव थोरात (महिमापूर) यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे (युजीसी) अध्यक्षपद भूषविलेले आहे. बळवंतराव देशमुख (रा. शिवर) यांनी महात्मा गांधी यांच्या मिठाच्या सत्याग्रहात सहभाग घेऊन तुरूंगवास भोगला. स्वतंत्रता संग्राम सेनानी म्हणून त्यांचा नावलौकीक आहे. बॅरिस्टर रामराव देशमुख (रा. शिवर), दादासाहेब काळमेघ (रा. चौसाळा), कोकीळाबाई गावंडे, डॉ. गणेश काळे, डॉ. बारब्दे, खामरे, सी. डी. देशमुख, टेलिकॉमचे संचालक लोथे, मळसणे, अॅड. अरुण शेळके (रामतीर्थ), सचिवपद भूषविलेले दांडगे, माजीमंत्री वसुधाताई देशमुख यांचे वडील, भांबूरकर, दाळू गुरूजी, गुलाबराव गावंडे, प्रकाश भारसाकळे, नितीन धांडे याशिवाय अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे इत्यादी मंडळीने दर्यापूर तालुक्याचे प्रतिनिधीत्व केलेले आहे, करीत आहेत.
64 वर्षीय न्यायमूर्ती भूषण गवई यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2025 पर्यंत असू शकेल. म्हणजेच सहा महिन्यांचा हा कालावधी आहे.
न्यायमूर्ती भूषण गवई हे एकट्या अमरावतीचे, महाराष्ट्राचे नव्हे तर आता संपूर्ण देशाचे आहेत. ते संपूर्ण देशाकडे एकसमान न्यायाच्या भूमिकेतून बघणार आहेत. परंतु काहीही असो, तुम्ही काही करा अगर नका करू, पदाचा प्रभाव आपसूक होत असतो. न्यायमूर्ती भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती होताच महाराष्ट्र राज्य सरकारने रा. सू. गवई यांच्या स्मारकासाठीचा निधी एका झटक्यात मंजूर केला. येथून पुढे किमान सहा महिन्यांसाठी का होईना, तमाम महाराष्ट्रासाठी तोच कित्ता राष्ट्रीय स्तरावर गिरवला जाण्याची निश्चिती आहे. पदाची कुठली भीती म्हणून नव्हे तर व्यक्तीचा सन्मान आणि पदाची गरीमा म्हणून मुख्य न्यायाधीशांच्या गृहराज्यातील खटला म्हणून महाराष्ट्रातील खटल्यांकडे बघितले जाणार नाही तर आश्चर्यच म्हणावे लागेल.
न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या गवई कुटुंबावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा आहे. व्यापक सामाजिक दृष्टीकोन आहे. रक्तात दलित, आदिवासी, शोषीतांची चळवळ भिनलेली आहे. गोरगरीबांचे दुःख, वेदना, समस्या याची कणव आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील दलित, शोषीत, वंचित घटकांचे जे प्रश्न न्यायव्यवस्थेसमोर निर्णयासाठी प्रलंबित आहेत, ते निकाली निघण्याचा प्रयत्न होईल, अशी अपेक्षा करू या! अमरावतीचे सूपूत्र न्यायाधीश भूषण गवई यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
-गोपाल हरणे, वरिष्ठ पत्रकार, अमरावती.
9422855496