आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी फेब्रुवारीत NSUI चा ‘उलगुलान’ मोर्चा
छत्रपती संभाजीनगर, दि. २९ एप्रिल २०२६ – आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) च्या वतीने दिनांक ११ फेब्रुवारी रोजी भव्य ‘उलगुलान’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवणे, ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना’तील त्रुटी दूर करणे, शासकीय वसतीगृहांची दुरवस्था सुधारणे, महाविद्यालयांकडून होणारी अवैध वसुली रोखणे, TRTI मार्फत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण तातडीने सुरू करणे तसेच आदिवासी राखीव पदांची बॅकलॉग भरती त्वरित राबवणे या प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.
NSUI ने यापूर्वीही या मागण्यांसंदर्भात प्रशासनाला अनेकवेळा निवेदने दिली होती. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे संघटनेने सांगितले.
मोर्चा सकाळी ११ वाजता गांधी भवन, शहागंज येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन सादर करण्यात येणार आहे.
NSUI जिल्हाध्यक्ष अभिषेक शिंदे पाटील आणि प्रदेश महासचिव सुभाष गावित यांनी सांगितले की, हा मोर्चा केवळ आंदोलन नसून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्क, मूलभूत सुविधा आणि आर्थिक न्यायासाठीचा लढा आहे. दुर्गम भागातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे त्यांचे नुकसान होत आहे.