कुर्बानी, मजबुरी की सदका-ए-जारीया? : किडनी दानाचा इस्लामिक पैलू

कुर्बानी, मजबुरी की सदका-ए-जारीया? : किडनी दानाचा इस्लामिक पैलू

      इस्लाममध्ये मानवी जीवन अत्यंत पवित्र मानले जाते. ते अल्लाहकडून दिलेली एक अमानत आहे ज्याचे संरक्षण आणि जतन करणे आवश्यक आहे. कुरआन शरीफमध्ये हा सिद्धांत अत्यंत सुंदर पद्धतीने मांडला आहे की ज्याने एका जीवाला वाचवले त्याने जणू संपूर्ण मानवजातीला वाचवले. ही आयत त्या सर्व कार्यांची पायाभूत ठरते जी एखाद्या जीवाचे रक्षण करण्यासाठी किंवा त्याचे जीवन सुधारण्यासाठी कारणीभूत ठरतात—ज्यामध्ये अवयव प्रत्यारोपण (Organ Transplantation) याचाही समावेश होतो. योग्य नैतिक तत्त्वांच्या अधीन राहून केलेले किडनी दान आणि त्याचे प्रत्यारोपण हे आजच्या काळातील अनेक उलेमा आणि मोठ्या फतवा संस्थांच्या मते— जसे की फिकह कौन्सिल ऑफ नॉर्थ अमेरिका, दारुल इफ्ताह मिस्र, इंटरनॅशनल इस्लामिक फिकाह अकादमी आणि दारुल उलूम देवबंद यांच्या मतानुसार जायज़ असून मोठ्या सवाबाचे सदका ठरते.

        उलेमा सर्वसाधारणपणे असे स्पष्ट करतात की जिवंत व्यक्तीकडून किडनी दान करणे तेव्हाच योग्य आहे जेव्हा रुग्णाला त्याची खरी गरज असते, त्याचा दुसरा चांगला पर्याय उपलब्ध नसतो आणि दान पूर्ण स्वेच्छेने केले जाते. या प्रक्रियेमुळे दात्याला नुकसान होता कामा नये, त्यात कोणतीही खरेदी-विक्री किंवा जबरदस्ती नसावी, मानवी सन्मान अबाधित राहावा आणि संभाव्य फायदा हा संभाव्य नुकसानीपेक्षा जास्त असावा. “ना स्वतः नुकसान सहन करा आणि ना दुसऱ्याला नुकसान पोहोचवा” हा इस्लामी सिद्धांत प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शक ठरतो.

           जर वैद्यकीय तज्ज्ञांनी दात्याला मोठ्या शस्त्रक्रियेच्या धोक्यांबद्दल सावध केले—उदा. किडनी बरगडीला जोडलेली असून ऑपरेशनमध्ये बरगडी कापावी लागणे—किंवा उरलेली किडनी पुढे योग्यरीत्या काम न करण्याची शक्यता असून त्याला डायलिसिस आणि आयुष्यभर वैद्यकीय बंधने पाळावी लागणे, तर असे दान नुकसानाच्या क्षेत्रात येते. अशा परिस्थितीत बहुतेक उलेमा पुढे जाण्यापासून रोखतात, कारण इस्लाम कोणालाही स्वतःला धोक्यात टाकण्याची सक्ती करत नाही.

         जबरदस्ती किंवा दबाव असेल तर परवानगीचा प्रश्न आणखी गंभीर होतो. जर पतीने पत्नीला किडनी न दिल्यास तलाक (Divorce ) देण्याची धमकी दिली किंवा मोठी रक्कम—उदा. पंचवीस लाख रुपये—देण्याची ऑफर केली, तर दानाची मूळ भावना म्हणजे स्वेच्छा नष्ट होते. कुटुंब तुटण्याच्या भीतीद्वारे निर्माण झालेला भावनिक दबाव खरी संमती संपवतो, तर आर्थिक प्रलोभन मानवी अवयवांच्या खरेदी-विक्रीच्या निषिद्ध क्षेत्रात येते. असे कृत्य मानवी सन्मानाच्या विरोधात असून स्पष्टपणे नाजायज़ आहे.

        रुग्ण अत्यंत नाजूक अवस्थेत असेल तर परिस्थिती अधिक गंभीर होते. डॉक्टरांनी सांगितले की रुग्ण केवळ हाडांचा सांगाडा उरला आहे, हृदय फक्त वीस टक्के काम करत आहे, हृदय-फुफ्फुसांभोवती व पोटात पाणी साचले आहे जे अनेक अवयव निकामी होण्याचे लक्षण आहे, आणि दान केलेली किडनीही (Mismatch ) पूर्णपणे जुळत नाही ज्यासाठी तीव्र प्रतिकारशक्ती दाबणारी औषधे घ्यावी लागतील—तर धोके खूप वाढतात. अशा वेळी ऑपरेशन सहन न होणे किंवा काही दिवस, आठवडे किंवा महिन्यांत मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. जेव्हा यशाची वास्तविक शक्यता अत्यंत कमी असते आणि या प्रक्रियेमुळे सन्मानाने जगणे परत मिळण्याऐवजी वेदना वाढण्याची शक्यता असते, तेव्हा इस्लामी तत्त्वानुसार फायदा नुकसानावर मात करत नाही.

       या सर्व परिस्थिती—दात्यासाठी वैद्यकीय धोका, जबरदस्ती किंवा आर्थिक दबाव आणि अत्यंत अशक्त रुग्ण ज्याच्यासाठी यशाची शक्यता फारच कमी आहे—यांचा विचार करता अनेक उलेमा या विशिष्ट प्रकरणात किडनी प्रत्यारोपण जायज नसल्याचा निष्कर्ष काढतात. इस्लाम जीव वाचवण्याला मोठे महत्त्व देतो, पण त्याच वेळी अनावश्यक नुकसान, जबरदस्ती, शरीराची व्यापारवृत्ती आणि निष्फळ उपचार यांनाही प्रतिबंध करतो.

        अशा कठीण परिस्थितीत प्रत्यारोपण शक्य नसल्यास करुणेवर आधारित उपशमन काळजी, दुआ, सब्र आणि शेवटच्या टप्प्यात रुग्णाच्या आराम व सन्मानाची काळजी घेणे हे इस्लामी शिकवणींशी पूर्णपणे सुसंगत आहे.

        शेवटी मानवी जीवनाच्या पवित्रतेची मागणी अशी आहे की असे निर्णय विचारपूर्वक आणि तत्त्वांनुसार घ्यावेत, जेणेकरून जीव वाचवण्याचा प्रयत्नही होईल आणि नुकसानापासून बचावही होईल.