सकाळच्या शाळा नको : महाराष्ट्राचे राज्यपाल

सकाळच्या शाळा नको : महाराष्ट्राचे राज्यपाल

       मुलांची झोप पूर्ण होण्याच्या दृष्टीने सकाळच्या शाळांच्या वेळा बदलण्याची सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केल्यानंतर, त्याला राज्यातील पालक, शिक्षक आणि अभ्यासकांकडून पाठिंबा मिळत आहे. सध्या सकाळच्या सत्रातील शाळा सात वाजताच्या आसपास भरत असून, ही वेळ नऊपर्यंत पुढे नेल्यास मुलांची झोप पूर्ण होऊन शिकण्यात लक्ष लागेल. पालकांची सकाळी पाच वाजल्यापासून होणारी धावपळ कमी होईल, अशी भूमिका पालकांकडून मांडण्यात येत आहे.

          ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी राज्यपाल बैस यांनी सकाळच्या सत्राच्या शाळांच्या वेळा बदलण्याच्या सूचना केल्या. बदलत्या जीवनशैलीनुसार प्रामुख्याने शहरी भागांतील पालकांच्या झोपेच्या वेळा बदलल्या असून, अनेक पालक रात्रपाळी आणि कामानिमित्त रात्री उशिरापर्यंत जागे असतात. त्यामुळे मुलेही रात्री उशिरापर्यंत जागी असतात. त्यातही मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ वाढला आहे. अनेक मुले रात्री मोबाइल किंवा कम्प्युटर पाहतात.

          अशा परिस्थितीत लहान मुलांच्या (पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक) शाळा सकाळी सातच्या आसपास भरतात. त्यासाठी मुलांना पहाटे सहा वाजल्यापासून, तर पालकांना जेवणाचा डबा आणि मुलांची तयारी करण्यासाठी पहाटे पाच वाजताच उठावे लागते. या सर्वांत मुलांची झोप पूर्ण होत नाहीच; शिवाय पालकांनाही धावपळ करावी लागते. या पार्श्वभूमीवर शाळांच्या सकाळच्या वेळा बदलण्याबाबत अधूनमधून चर्चा होते. मात्र, राज्यपाल बैस यांनी सरकारला सूचना दिल्यामुळे, आता पालकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सरकार सकाळी भरणाऱ्या शाळांच्या वेळा बदलणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.