आमखास मैदानावर एज्युकेशन एक्सपो-2024 चे आयोजन

आमखास मैदानावर एज्युकेशन एक्सपो-2024 चे आयोजन

औरंगाबाद, 8 डिसेंबर  : ऐतिहासिक आमखास मैदानावर 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर दरम्यान एज्युकेशन एक्सपो-2024 आयोजित करण्यात येणार आहे. याविषयी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, ज्यात आयोजकांनी या एक्सपोच्या उद्देशाबद्दल आणि यावर्षीचे विशेष वैशिष्ट्ये स्पष्ट केली.

          पत्रकार परिषदेत माइंडस इन मोशन फाऊंडेशनचे अध्यक्ष बासित सिद्दीकी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि पालकांना या एक्सपोचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले. त्यांनी सांगितले की, "हा एक्सपो विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणातील अडचणींवर मात करण्यासाठी एक उत्तम संधी आहे. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसाठी मार्गदर्शन, नोकरीच्या संधी, आणि शिक्षणाच्या क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या गोष्टींबद्दल माहिती मिळेल."

          त्यांनी पुढे सांगितले की, "शिक्षकांसाठी देखील ग्रुप डिस्कशन, करिअर गाईडन्स आणि शिक्षणाच्या सुविधांबद्दल विशेष मार्गदर्शन दिले जाईल." यावर्षी 137 पुस्तकं आणि विविध शैक्षणिक व फूड स्टॉल्स देखील उपलब्ध असतील, ज्यामुळे विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सामग्री आणि साधनांचा अनुभव घेता येईल.

          पत्रकार परिषदेत सफर खान, सुलैमान शाहीन, नोमान सौदागर, आदील अजिज सिद्दीकी, बदर बिन सुलैमान यांची उपस्थिती होती. त्यांनी देखील या एक्सपोच्या महत्त्वावर भाष्य केले आणि विद्यार्थ्यांना याचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले.

          उद्घाटन समारंभ 15 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2 ते 5.30 वाजेच्या दरम्यान होईल, अशी माहिती देखील पत्रकार परिषदेत देण्यात आली. या उद्घाटन समारंभात एमजीएम विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. अंकुशराव कदम, महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत, शिक्षातज्ञ शेषराव चौव्हान, ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सेक्रेटरी मौलाना उमरैन महेफुज रहेमानी, जामिया इस्लामिया इशाअतूल उलूमचे अध्यक्ष मौलाना हुजैफा वस्तानवी, अल जामिया मोहंमदीया एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मौलाना अरशद मुख्तार, इस्लामिक रिसर्च सेंटरचे अध्यक्ष एड. फैज सय्यद, जमात-ए-इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष एस. अमीनुल हसन, इकरा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांसारखे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

          आयोजकांनी यावर्षीचा एज्युकेशन एक्सपो अधिक यशस्वी व्हावा आणि विद्यार्थ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन मिळावे, यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.