राष्ट्र आणि राष्ट्रीय......

राष्ट्र आणि राष्ट्रीय......

राष्ट्रीय ध्वज (झेंडा) - तिरंगा : आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय ध्वज आयताकृती असून तिरंगा आहे. ध्वजाच्या लांबी-रुंदीचे प्रमाण हे २:३ असे आहे. माहितीस्तव बाजूस ध्वजाचे कृष्णधवल छायाचित्र  स्वरूपातील चित्र दिले आहे. ध्वजाचा वरच्या भागात नांरगी रंग, मध्य भागात पांढरा रंग तर खालच्या भागात हा हिरवा रंग असून एक नितांत सुंदर असा ध्वज साकारला गेला आहे. ध्वजाच्या मध्यात असलेल्या पांढऱ्या भागाच्या केंद्रस्थानी निळ्या रंगात अशोक स्तभांतील २४ रेषांचे चक्र आहे. भारताच्या घटना समितीने २२ जुलै १९४७ रोजी राष्ट्रीय ध्वजाचे हे परिपूर्ण स्वरूप राष्ट्रीय ध्वजाकरिता निश्चित केले.
ध्वजाचा आदर, मान-सन्मान आणि याशी निगडीत इतर महत्वपूर्ण सूचना व नियम शासनाने वेळोवेळी निर्गमित केले आहेत. राष्ट्र, राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रगीत आणि एकूण राष्ट्रीय संकल्पनांचा आदरभाव व अभिमान हे प्रत्येक भारतीयाचे परम कर्म होय.

राष्ट्रीय प्राणी - वाघ :
शास्त्रीय नाव: Panthera Tigris
भारत देशाचा राष्ट्रीय प्राणी वाघ असून उजव्या बाजूस असलेले वाघाचे हे चित्र आपणांस त्याची बहुतांश वैशिष्ट्ये दर्शविण्यास पुरेसे आहे. गडद पिवळ्या रंगावर काळे पट्टे असलेला हा रूवाबदार प्राणी शक्ती व डौलदार  जीवनशैलीचा प्रभाव स्वतःच्या आस्तित्वाने दर्शवितो. शक्तीमान प्राण्यांपैकी विशेष मान वाघालाच मिळतो.
राष्ट्रीय प्राणीच नव्हे तर इतर सर्व प्राण्यांच्या जगण्याच्या नैतिक अधिकारावर गदा येईल असे वर्तन करण्यापेक्षा त्यांच्या संरक्षणातच निसर्गाचा समतोल कार्यक्षम आहे. काळाच्या ओघात विविध प्रयोजनांसाठी किंवा अमापनुष तत्यांच्या आहारी जाऊन प्राण्यांची होत असलेली सर्रास कत्तल थांबविणे अत्यावश्यक आहे, नसता भविष्यात या प्राण्यांचे चित्रांतूनच दर्शन होईल.

राष्ट्रीय वृक्ष - वह /वटवृक्ष :
शास्त्रीय नाव : Ficus Bengalensis
राष्ट्रीय वृक्ष म्हणून वडाची म्हणजेच वटवृक्षाची निवड करण्यात आली आहे. या वृक्षास सनातन धर्ममान्यतेनुसार व भारताच्या ग्रामीण भागातही फार महत्व प्राप्त आहे. खेड्यापाड्यातून आजही वडाचे महत्व जपले जात असून उसंतीचे क्षण,  चर्चा, सणासुदीचे औचित्य, समारंभ, बैठका, इत्यादी याच वटवृक्षाच्या छायेत व्यतीत होतात.

राष्ट्रीय पक्षी - मोर :
शास्त्रीय नाव: Pavo Cristatus
भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. मोर पाहून आपणांस विधात्याच्या कलात्मक शैलीचा प्रत्यय जास्तच प्रकर्षाने होतो. वगळ्याच्या आकाराचा हा पक्षी त्याच्या रंगसंगती, शरीराची ठेवण आणि शानदार पिसाऱ्याने लगेच नजरेत भरतो.
"नाच रे मोरा आंब्याच्या वनात....", हे बोल नकळतपणे या प्राण्याच्या लोकप्रियतेची हलकीशी झलक दर्शवून जाते. मनसोक्त आनंदात हर्षभरित होऊन मोराचे पिसारा फुलवून नृत्य करणे हे फारच मनोमोहक आणि रोमहर्षक असते. या प्राण्यास राष्ट्रीय पक्षी हा मान देणे खरेच शोभतो.

राष्ट्रीय फूल  - कमळ :
शास्त्रीय नाव: Nelumbo Nucipera Gaertn
विधात्याच्या अप्रतिम कलाकृतीपैकी, निसर्गाच्या मोलाच्या वरदानापैकी एक म्हणजे हे फुल-फळ वगैरे होय. त्यातच अबोल फुलांचे रंग व कोमलता मनास समाधानप्रद ठरते. प्रेमाचे प्रतिक असणारे फूल हे भावविश्वात अतिविशेष होय.
प्रेम, आपुलकी आणि कोमलतेचे परिपूर्ण प्रतिक भासणाऱ्या या फुलांपैकी कमळाचे फुल हे जास्तच विशेष होय. बहुतांशी चिखलात किंवा दलदलीमध्ये जन्मूनही स्वतःचे आस्तित्व जपणारे हे चमत्कारिक आस्तित्व खरेच अतिविशेष असेच आहे.

राष्ट्रीय फळ - आंबा :
उत्पत्ती स्त्रोत : Tree of Mangifera Indica
फळांचा राजा आंबा आणि हाच आंबा आहे आपले राष्ट्रीय फळही स्वादिष्ट व बहु-उपयोगी असा आंबा निश्चितच विधात्याने मानवास दिलेले रसरशीत व गोड असे वरदानच आहे. खानपानाची  लज्जत वाढविणारे लोणचेही याच आंब्याच्या रूपापैकी एक होय. महत्याचे ते असे की जीवनसत्व अ, ब आणि ड चा उत्तम संगम यात साधून हे आरोग्यास वर्धक असेच आहे. असा हा वैशिष्ट्यपूर्ण आंबा का आणि कोणाला नाही आवडणार?
आंब्याची महती थोडक्यात वर्णन करणे अशक्यप्राय आहे. महान कवी कालिदासानेही आंब्याचे गुणविशेष वर्णिले आहेतच. तर मुघल सम्राट अकबर यांनी लखी बाग दरभंगा, बिहार येथे १,००,००० आंब्याच्या झाडांची लागवड केली. युआन श्वांग या चिनी प्रवाश्याच्या वर्णनातून जाणवते की रोमन सम्राट अलेक्झांडर यांनाही आंब्याच्या अप्रतिम स्वादाने मोहित केले होते.

राष्ट्रीय खेळ - हॉकी :
भारताच्या राष्ट्रीय खेळरूपाने हॉकीस मान देण्यात येतो आणि हॉकी या खेळाने तो मान वेळोवेळी सार्थही ठरविला आहेच. १९२८ ते १९५६ हा भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ होय. हॉकीच्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने ८ सुवर्णपदक जिंकून सर्वोकृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यापैकी ६ सुवर्णपदकं भारताने सलग जिंकली आहेत. १९७५ चे हॉकीचे जगज्जेतेपदही भारताने जिंकले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही भारतीय हॉकीची प्रगती वाखाणण्याजोगीच राहली आणि यापुढेही भारतीय हॉकीतच  नव्हे तर सर्वच क्षेत्रांत प्रगतीची शिखरं पादाक्रांत करून विक्रमांचा विक्रम रचून एक महासत्ता ठरो हीच कार्यक्षम मनोकामना.

राष्ट्रीय नदी - गंगा :
जगातील मोठ्या नद्यांत गणना होणारी भारतातील सर्वात मोठी नदी (सुमारे २५१० किलोमीटर) गंगा नदी ही भारताची राष्ट्रीय नदी होय. गंगा नदी हिमालयातून भगीरथी नदीरूपाने उगम पावते, पुढे यास अलकनंदा-यमुना-कोसी-गोमती आदी नद्याही येऊन मिळतात, जवळपास १,००,००० किलोमीटरचा प्रदेश सुखसमृद्धीने व्यापून तपश्चात गंगा नदी बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते. या विराट नदीवर  हरिद्वार व फराक्का येथे दोन मोठी धरणं आहेत. सनातन धर्मात अनन्यसाधारण महत्व असणाऱ्या गंगा नदीच्या वाराणसी, हरिद्वार आणि अलाहाबाद शहरांच्या तटांवर धार्मिक सोपस्कार व विधीवत पूजा-यज्ञकर्म-सोपस्कार-संस्कार पार पाडले जातात.

- इकबाल सईद काझी (विश्लेषक/लेखक/कवी)