परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्जाची अंतिम मुदत वाढवण्याची मागणी

परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्जाची अंतिम मुदत वाढवण्याची मागणी
Adv Azhar Pathan, President, MARTI Kruti Samiti

औरंगाबाद, २७ डिसेंबर : महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र, यंदाच्या अर्ज प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी, माहितीचा अभाव आणि विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची अपूर्णता यामुळे अनेक पात्र विद्यार्थी अर्ज सादर करू शकले नाहीत. त्यामुळे या अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्याची मागणी मार्टी कृती समिती, महाराष्ट्र राज्याने केली आहे.

          अल्पसंख्याक समुदायातील 75 गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील सर्वोत्तम 200 विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी पहिल्या फेरीत 75 पैकी केवळ 24 विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया सप्टेंबर 2024 मध्ये पूर्ण झाली आहे.

          अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 निश्चित करण्यात आली आहे. परंतु तांत्रिक समस्या, विद्यार्थ्यांना पुरेशी माहिती नसणे, तसेच कागदपत्रांच्या अपूर्णतेमुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांना अद्याप अर्ज करता आलेला नाही.

          मार्टी कृती समितीचे अध्यक्ष एड. अजहर पठाण यांनी मुख्यमंत्री, अल्पसंख्याक विकास विभाग, आणि अल्पसंख्यांक आयुक्त यांना निवेदनाद्वारे अर्ज सादर करण्यासाठी 15-20 दिवसांची मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे. अर्जाची मुदत वाढविल्यास अधिकाधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, असा त्यांचा विश्वास आहे.

          या मागणीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी हवी ती संधी मिळू शकते. त्यामुळे शासनाने सकारात्मक पाऊल उचलून अर्ज सादर करण्याची मुदत वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

          जर मुदतवाढ दिली गेली, तर अर्ज सादर करण्यासाठी थोडा अधिक वेळ मिळाल्याने विद्यार्थ्यांना आपले कागदपत्र पूर्ण करून अर्ज सादर करता येईल आणि महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल.