इनोसंट नेटवर्कच्या वतीने निरपराध तरुणांचा रोजा इफ्तार हृदयस्पर्शी कार्यक्रम संपन्न

इनोसंट नेटवर्कच्या वतीने निरपराध तरुणांचा रोजा इफ्तार हृदयस्पर्शी कार्यक्रम संपन्न

        मुंबईच्या कुर्ला येथे डॉ. अब्दुलवाहिद शेख ( बेगुनाह कैदी ) इनोसंट नेटवर्क या संघटनेच्या वतीने एक अत्यंत आगळावेगळा, हृदयस्पर्शी आणि समाजाला विचार करायला भाग पाडणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. देशात गेल्या काही वर्षांत घडलेल्या अनेक बॉम्बस्फोटांच्या खोट्या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेल्या अनेक मुस्लिम युवकांनी तब्बल 10 ते 20 वर्षे तुरुंगात घालवली. न्यायालयीन प्रक्रियेनंतर शेवटी ते निर्दोष असल्याचे सिद्ध झाले आणि त्यांची मुक्तता झाली. परंतु त्यांच्या आयुष्यातील अमूल्य वर्षे तुरुंगाच्या भिंतीआडच निघून गेली.

        रोजा इफ्तार या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हज हाऊसचे मौलाना गुलाम याहया यांनी भूषवले. गुजरात अक्षरधाम मंदिर हल्ला प्रकरणी मौलाना गुलाम याहया अनेक वर्ष तुरुंगात होते. सदर कार्यक्रमात असे अनेक लोक उपस्थित होते ज्यांनी वर्षानुवर्षे निरपराध असतानाही कारावास भोगला. 2006 मुंबई साखळी बॉम्बस्फोट, पुणे जंगली महाराज बॉम्बस्फोट, औरंगाबाद 2006 शस्त्रसाठा जप्ती प्रकरण, व महाराष्ट्रात अन्य ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटातील संशयित मुस्लिम तरुण व तसेच भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणात अटक झालेल्या काही व्यक्तींचीही उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती.

          रोजा इफ्तार कार्यक्रमात उपस्थित असलेल्या या सर्वांनी आपल्या आयुष्यातील वेदनादायक अनुभव अत्यंत प्रामाणिकपणे मांडले. त्यांनी सांगितलेल्या कथा ऐकताना उपस्थितांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू तरळत होते. निरपराध असताना वर्षानुवर्षे तुरुंगात राहण्याची वेदना, कुटुंबापासून दूर राहण्याची वेदना आणि समाजाने केलेल्या शंकेच्या नजरेचा भार — हे सर्व अनुभव त्यांनी शब्दांत मांडले. त्या क्षणी संपूर्ण सभागृहात एक वेगळीच शांतता आणि भावनिक वातावरण निर्माण झाले होते.
         ज्या लोकांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आमची संघटना मूलनिवासी मुस्लिम मंच, कुल जमाती तंजीमचे अध्यक्ष मौलाना अब्दुल हमीद अझहरी, न्यायमूर्ती बी.जी कोळसे पाटील, रिटायर्ड आयजी एसएम मुश्रीफ, बामसेफ संघटनेचे अध्यक्ष वामन मेश्राम, छावा संघटनेचे अध्यक्ष बाबा पाटील आम्ही सर्वांनी संपूर्ण देशभर आवाज उठवत आहे, न्यायासाठी चळवळ उभी करत आहे, अशा लोकांसोबत एकत्र बसून रोजा इफ्तार करण्याची संधी आयोजकांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आम्ही इनोसंट नेटवर्कचे मनापासून आभार मानतो.

       या रोजा इफ्तार कार्यक्रमात त्यांचे अनुभव ऐकताना एका बाजूला मनात तीव्र वेदना निर्माण होत होत्या — कारण निरपराध लोकांचे आयुष्य अन्यायाने हिरावले गेले होते. पण दुसऱ्या बाजूला एक वेगळाच आनंदही होता — कारण आज ते सर्वजण स्वातंत्र्याने, सन्मानाने आणि आपल्या लोकांमध्ये बसून एकत्र रोजा इफ्तार करत होते.

       हा कार्यक्रम केवळ इफ्तारचा नव्हता, तर तो न्याय, सहानुभूती आणि मानवी मूल्यांची आठवण करून देणारा एक सामाजिक संदेश होता. समाजाने अशा घटनांमधून शिकून अन्यायाविरुद्ध उभे राहणे आणि निरपराध लोकांच्या बाजूने आवाज उठवणे हीच खरी मानवता आहे.

       आज जे लोक अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मुक्त झाले आहेत, ते आपल्या समोर जिवंत उदाहरण म्हणून उभे आहेत — की सत्य कितीही उशिरा का होईना, पण एक दिवस नक्कीच समोर येते.

 "सत्य की जय हो"
• अंजुम इनामदार
अध्यक्ष: मूलनिवासी मुस्लिम मंच
9028402814