चमकदार मक्का गेट, पण खाली कचऱ्याचं साम्राज्य! : स्मार्ट सिटीचा बुरखा, मनपाची उघडी बेपर्वाई

चमकदार मक्का गेट, पण खाली कचऱ्याचं साम्राज्य! : स्मार्ट सिटीचा बुरखा, मनपाची उघडी बेपर्वाई

संभाजीनगर (औरंगाबाद) : छत्रपती संभाजीनगर शहरातील ऐतिहासिक मक्का गेट आज स्मार्ट सिटी प्रकल्पाचं झगमगीत पोस्टर बनलं असलं, तरी त्याच मक्का गेटखालील वास्तव मात्र विदारक आणि लाजिरवाणं आहे. एका बाजूला सुंदर रंगसंगती, आकर्षक रचना आणि ‘स्मार्ट सिटी’चा डंका, तर दुसऱ्या बाजूला त्याच पुलाखाली खाम नदीत फेकला जाणारा घरगुती कचरा, प्लास्टिक, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा विळखा!
टीव्हीवर पूर्वी येणाऱ्या ‘चहेरा नूरानी, एडिया फटी हुवी’ या जाहिरातीप्रमाणेच आज मक्का गेटचं रूप झालं आहे. वरून देखणा, पण आतून कुजलेला!

         तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी खाम नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला होता. नदी सुशोभीकरणाच्या गप्पा, फाईल्स आणि उद्घाटनं झाली. मात्र आज त्या साऱ्या प्रयत्नांवर नागरिकांची बेफिकिरी आणि महानगरपालिकेची उदासीनता पाणी फेरताना दिसते.

         मक्का गेटसमोरील पुलावर दोन्ही बाजूंना संरक्षण जाळी नसल्यामुळे बेगमपुरा, जयसिंगपूरा, विद्यापीठ परिसर, बीबी का मकबरा परिसरातील तथाकथित ‘सुशिक्षित’ नागरिक, महिलांसह, थेट पुलावरून कचरा खाम नदीत फेकत आहेत. पुलाखालचा परिसर अक्षरशः डम्पिंग ग्राउंडमध्ये बदलला आहे.

        स्मार्ट सिटीचा दर्जा नेमका कुणासाठी? फोटोसेशनसाठी की जाहिरातींसाठी? स्वच्छतेच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च होतात, पण साधी जाळी बसवायला महानगरपालिकेला वेळ नाही, इच्छाशक्ती नाही!

         महानगरपालिका प्रशासन, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची ही सामूहिक अपयशाची कहाणी आहे. गेटची दुरुस्ती करून शहराचा चेहरा झाकण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण खाली साचलेला कचरा सत्य ओरडून सांगतोय — स्मार्ट सिटी फक्त कागदावरच!

         प्रश्न एकच आहे —मक्का गेट सुंदर दिसणं महत्त्वाचं की खाम नदी व शहर स्वच्छ ठेवणं?आणि याचं उत्तर आता छत्रपती संभाजीनगरकर मागत आहेत!