बुडणाऱ्या बाप लेकीचे जीव वाचवणारे वीर डॉ. मुजाहिद मोमीन

बुडणाऱ्या बाप लेकीचे जीव वाचवणारे वीर डॉ. मुजाहिद मोमीन

बीड, १ सप्टेंबर: पाली येथील तलावाच्या छोट्या चादरजवळ अजीजपूरा येथील एका कुटुंबावर मोठे संकट कोसळले. कुटुंबातील १२ वर्षीय मुलगी सेल्फी घेत असताना चुकून तलावात घसरून पडली. मुलीला वाचवण्यासाठी तिचे वडील पाण्यात उतरले, मात्र दोघेही पाण्यात तडफडू लागले. हे दृश्य पाहून आजूबाजूची गर्दी मात्र धास्तावून पळून गेली, मदतीस कोणीही पुढे सरसावले नाही. दरम्यान, घरच्यांचा आक्रोश ऐकून डॉ. मुजाहिद मोमिन धावत घटनास्थळी आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तलावात उडी घेतली आणि अतुलनीय धाडस दाखवत बाप-लेकीचे प्राण वाचवले. त्यांच्या या शौर्यकृतीबद्दल परिसरातून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.

       डॉ. मोमिन यांनी दाखवलेली धाडस, शौर्य, मर्दानगी व मानवी मूल्यांची जपणूक समाजासाठी आदर्श ठरत आहे. त्यांच्या कृतीमुळे एक कुटुंब वाचले, दोन जीव वाचले आणि घराचा आधार वाचला. डॉक्टर मुजाहिद मोमीन हे एड. अक़ील व मोमीन इसाक सर यांचे बंधू आहे. म्हणूनच म्हणतात की पोहता येणं आवश्यक आहे. डॉक्टर मोमीन यांच्या वडिलांनी त्यांना त्यांच्या भावांना व बहिणींनाही पोहायला शिकवलं. पोहणं हे फक्त जीवन वाचवण्याचं कौशल्यच नाही, तर एक उत्तम व्यायामही आहे.

       घटनेनंतर अनेकांनी सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. मात्र डॉ. मोमिन यांनी स्पष्ट संदेश दिला की – सेल्फी नको, संकटसमयी मदतीस धावून या. गरजूंच्या मदतीला धावणे हेच खरे मानवतेचे कार्य आहे. मिल्लत ग्रुप ऑफ स्कूल्स व मिल्लत परिवाराच्या वतीने डॉ. मुजाहिद मोमिन यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या या धाडसी व शौर्यपूर्ण कार्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा व शुभाशिर्वाद देण्यात आले.