सरकारी कॉलेज, पण चुलीवर स्वयंपाक! — GECA वसतिगृहातील धक्कादायक वास्तव

सरकारी कॉलेज, पण चुलीवर स्वयंपाक! — GECA वसतिगृहातील धक्कादायक वास्तव

छत्रपती संभाजीनगर :ज्या शहराला राज्याची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते आणि ज्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने देशाला नामांकित अभियंते दिले, त्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (GECA) च्या वसतिगृहात आज विद्यार्थ्यांवर चक्क चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे निर्माण झालेल्या या धक्कादायक परिस्थितीची पाहणी NSUI छत्रपती संभाजीनगरच्या पदाधिकाऱ्यांनी केली असता प्रशासनाचा उदासीन आणि क्रूर चेहरा उघड झाला.

          NSUI चे शहराध्यक्ष अॅड. अभिषेक शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज GECA वसतिगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांची अवस्था प्रत्यक्ष पाहिली. वसतिगृहात गॅस उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना धुराच्या लोटात चुली पेटवून स्वयंपाक करावा लागत असल्याचे चित्र समोर आले.

          यावर संताप व्यक्त करत शिंदे पाटील म्हणाले की,“गॅस सिलेंडरचे दर अडीच हजारांच्या पुढे गेले आहेत. सामान्य नागरिकांचे हाल होतच आहेत, पण आता शासकीय संस्थांनाही गॅस मिळेनासा झाला आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ म्हणणारे सरकार विद्यार्थ्यांना मात्र धुरात ढकलत आहे. ही परिस्थिती अत्यंत लाजिरवाणी आहे.”

          त्यांनी पुढे सांगितले की, काल या गंभीर प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांना स्वतः आदेश द्यावे लागले, यावरूनच प्रशासनाची यंत्रणा किती कोलमडली आहे हे स्पष्ट होते. “गॅस कंपन्यांवर सरकारचे नियंत्रण उरले नाही का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

          सध्याच्या अमेरिका–इस्रायल–इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेल्या कमर्शियल गॅस सिलेंडर संदर्भातील धोरणाचा थेट फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचा आरोप NSUI ने केला आहे. शिक्षणासाठी घरापासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे इंधनटंचाईचा आणि महागाईचा फटका बसणे हे केंद्र सरकारच्या अपयशी धोरणाचे उदाहरण असल्याची टीकाही करण्यात आली.

          दरम्यान, विद्यार्थ्यांना तात्काळ गॅस पुरवठा करावा आणि महाविद्यालयाच्या वसतिगृहातील ही गंभीर परिस्थिती तातडीने दूर करावी, अशी मागणी NSUI ने प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.