पत्रकाराला ट्रक खाली चिरडून टाकण्याची धमकी; गंभीर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर, दि २८ एप्रिल : संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यातील पैठण पोलीस ठाण्यात एका पत्रकाराला धमकावल्याच्या प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 28 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळी 6:12 वाजता हा FIR नोंदविण्यात आला असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार नंदकिशोर राधाकिशन मगरे (वय 45, व्यवसाय – वृत्तपत्र तालुका प्रतिनिधी) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, ते पैठण तालुक्यातील बातम्या संकलित करण्याचे काम करतात. 28 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 6:30 वाजता ते पेठण-शहागड रस्त्यावर बातमीसाठी गेले असताना त्यांना वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या दिसल्या. त्या संदर्भात व्हिडिओ आणि फोटो काढत असताना आरोपी रमेश उर्फ लालू तुकाकराम वीर (रा. पन्नालालनगर, पैठण) यांनी त्यांना अडवले.
फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, आरोपीने पत्रकाराला धमकावत, " तुम्ही पत्रकार लोक आमच्या वाळूच्या गाड्याच्याच का बातम्या लावता, तुम्हाला दुसरे कामधंदे नाहीत का, तू कोण आहेस मला माहित आहे, महारड्या तुम्ही आमच्याच तुकड्यावर जगता, पत्रकार झाला म्हणून शहाणपणा करू नको, तू जर गडाची बातमी लावली तर तुला गाडी खाली घेऊन विषय संपून टाकील, मी राजकारणी आहे, माझे कुणी वाकडे करू शकत नाही, तुझा तपास पण लागणार नाही," अशा शब्दांत सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकारामुळे तक्रारदार घाबरले असून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. तसेच हा प्रकार पत्रकारितेच्या कामात अडथळा निर्माण करणारा असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 351(3), 352 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 मधील कलम 3(1)(r), 3(1)(s) आणि महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती व संस्था (हिंसा व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम 2017 अंतर्गत कलम 4 लागू करण्यात आले आहेत.
या गुन्ह्याचा पुढील तपास पैठण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी (Dy.SP) सुनील सुरेश पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.