पुणे जर्मन बेकरी स्फोटातील आरोपीची हत्या? खोटी बातमी देऊन खऱ्या गुन्हेगाराला वाचविण्याचा षडयंत्र कोणाचे?
31 डिसेंबर 2025 रोजी श्रीरामपूर( अहिल्यानगर ) येथे बंटी जागीरदार यांची अज्ञात इसमांकडून गोळी झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना केवळ एका व्यक्तीची हत्या नव्हे, तर संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यासाठी एक मोठा धक्का आहे. प्राथमिक माहितीनुसार ही हत्या राजकीय वैमनस्यातून किंवा जुने वाद असल्याचे समोर येत आहे. बंटी जागीरदार हे मूळचे श्रीरामपूरचे रहिवासी असून स्थानिक राजकारणात अत्यंत सक्रिय, धाडसी आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्यांचे कौटुंबिक आणि राजकीय संबंध होते. त्यांच्या आई श्रीरामपूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका होत्या, तर त्यांचे चुलत बंधू रईस जागीरदार हे नुकतेच काँग्रेस पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
बंटी जागीरदार हे पूर्वी राष्ट्रवादी पक्ष, तर आता काँग्रेसमध्ये कार्यरत असताना इतर पक्षांशीही त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध होते. अनेक उमेदवारांना निवडून आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. राजकारणात पक्षांतर, माघारी, प्रचारासाठी कार्यकर्त्यांची ताकद उभी करणे – अशा अनेक आघाड्यांवर ते कुशल रणनीतीकार म्हणून ओळखले जात. ही बाब संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यातील जनतेला ज्ञात होती.
त्यांचा जनसंपर्क, प्रभाव आणि कामाची पद्धत यामुळे अनेक राजकीय मंडळी व त्यांचे शत्रू त्यांच्याबाबत सावध असत. नेमका कोणत्या क्षणी कोणता निर्णय घेतील, हे कोणालाही सांगता येत नसे. अशा अत्यंत हुशार, धाडसी आणि जिगरबाज व्यक्तीच्या अचानक जाण्याने जनमानसात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.
२०१२ मधील पुणे बॉम्बस्फोट आणि बंटी जागीरदार यांचे नाव
1 ऑगस्ट 2012 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी पुण्यात कमी तीव्रतेचे साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या घटनेचा तपास दिल्ली स्पेशल सेल आणि महाराष्ट्र एटीएस यांनी संयुक्तपणे केला. दिल्ली स्पेशल सेलने 4 संशयित आरोपी तर महाराष्ट्र एटीएसने 4 संशयित ताब्यात घेतले. या आठ संशयितांमध्ये बंटी जागीरदार यांचेही नाव होते. मात्र या सर्व संशयितांपैकी बंटी जागीरदार हे एकमेव व्यक्ती होते, ज्यांना अवघ्या दोन वर्षांत न्यायालयाने जामिनावर मुक्त केले. पुण्यातील जंगली महाराज रोड बॉम्बस्फोट प्रकरणाची मुंबई न्यायालयात फास्ट ट्रॅकवर दररोज सुनावणी सुरू असून, लवकरच या खटल्याचा निकाल अपेक्षित आहे.
अजमेर शरीफ दर्गा, मालेगाव, मक्का मस्जिद, समझोता एक्सप्रेस यांसारख्या अनेक बॉम्बस्फोट प्रकरणांचा बारकाईने अभ्यास केला असता, बहुतेक प्रकरणांत निर्दोष व्यक्तींना संशयाच्या आधारे अटक करून नंतर न्यायालयात त्यांची निर्दोष सुटका झाल्याचे वास्तव समोर येते. त्यामुळे पुणे जंगली महाराज बॉम्बस्फोट प्रकरणातही सत्य काय आहे, हे न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट होईल, याची सर्वांना प्रतीक्षा आहे.
खोटी बातमी आणि धोकादायक दिशाभूल
अत्यंत गंभीर बाब म्हणजे, “जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी बंटी जागीरदार यांची हत्या झाली” अशी खोटी व दिशाभूल करणारी बातमी काही इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाने प्रसारित केली. यामागचा हेतू काय? जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा खरा सूत्रधार सारंग अकोलकर (सारंग कुलकर्णी) आजतागायत फरार आहे. तपास यंत्रणांना त्याचा मागमूस लागलेला नाही.
मग प्रश्न उपस्थित होतो की, बंटी जागीरदार यांच्या हत्येचा वापर करून जर्मन बेकरी बॉम्बस्फोट त्यांच्या माथी मारण्याचा आणि खऱ्या आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न कोण करत आहे? कोणाच्या इशाऱ्यावर माध्यमे कोणतीही खात्री न करता अशा संवेदनशील आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या खोट्या बातम्या पसरवत आहेत?
हे केवळ पत्रकारितेचे अपयश नाही, तर देशातील तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था आणि समाजाच्या शांततेशी केलेली घोर फसवणूक आहे. यापूर्वीही अनेक वेळा एखाद्या मुस्लिम व्यक्तीला संशयित ठरवून “सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या” नावाखाली समाजात द्वेष पसरविण्याचे काम काही माध्यमांनी केले आहे. वृत्तपत्रातील बातम्या आणि प्रत्यक्ष आणि तपासयंत्रणाची चार्जशीट यामध्ये मोठी तफावत आढळते, हे वास्तव अनेक खटल्यांतून सिद्ध झाले आहे.
शेवटी एकच प्रश्न…
खोट्या बातम्यांद्वारे कोणाचे पाप झाकले जात आहे? कोणाच्या संरक्षणासाठी मृत व्यक्तीची प्रतिमा मलीन केली जात आहे? आणि माध्यमांची ही बेजबाबदार भूमिका लोकशाहीसाठी किती घातक आहे?
या प्रश्नांची उत्तरे शोधणे, सत्य समोर आणणे आणि खोट्या प्रचाराला थारा न देणे, हीच आजच्या सुज्ञ समाजाची खरी कसोटी आहे.
- अंजुम इनामदार, पुणे
अध्यक्ष: मूलनिवासी मुस्लिम मंच
संपर्क नंबर: 9028402814