जिल्हा परिषदेत ‘मैत्री’चा बुरखा फाडला! भाजपाची एकहाती सत्ता; महायुतीत उघड फुट

जिल्हा परिषदेत ‘मैत्री’चा बुरखा फाडला! भाजपाची एकहाती सत्ता; महायुतीत उघड फुट

छत्रपती संभाजीनगर, दि. 18 (विशेष प्रतिनिधी) –महायुतीच्या नावाखाली चाललेली ‘सत्तेची दोस्ती’ अखेर जिल्हा परिषद निवडणुकीत उघडपणे कोसळली. शब्दांनी मैत्री आणि कृतीत विश्वासघात—अशा दुहेरी भूमिकेत भाजपाने पुन्हा एकदा आपली राजकीय चालबाजी दाखवत जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता काबीज केली.

     अध्यक्षपदी अविनाश गलांडे आणि उपाध्यक्षपदी जितेंद्र जैस्वाल यांची बिनविरोध निवड ही केवळ निवड नव्हे, तर महायुतीतील फूट आणि परस्परांवरील अविश्वासाचा स्फोट ठरला आहे.

     महायुतीच्या बैठकीत ठरलेले निर्णय कागदावरच राहिले आणि ऐनवेळी भाजपाने ‘खेळी’ करत शिंदेसेनेला राजकीय पटावरून बाहेर ढकलले. सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने महाविकास आघाडीतील सदस्यांनाही गळाला लावत ‘ऑपरेशन मिनीमंत्रालय’ यशस्वी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

     शिंदेसेनेने बहिष्काराचा मार्ग स्वीकारला, तर उबाठा गटाने तटस्थ भूमिका घेतली. मात्र, या सगळ्या गोंधळात भाजपाने आपला डाव अचूक साधत निवडणूक बिनविरोध करून घेतली. मतदानाची वेळच आली नाही आणि सत्ता थेट भाजपाच्या पदरात पडली—हेच या सत्तानाट्याचे खरे वैशिष्ट्य!

     महायुतीत ‘पहिले अडीच वर्षे कोणाचे?’ या प्रश्नावरून सुरु झालेली कुरघोडी शेवटी उघड फुटीत परिवर्तित झाली. मुख्यमंत्री स्तरावर निर्णय झाल्याचा दावा होत असतानाही स्थानिक पातळीवर भाजपाने तो धाब्यावर बसवल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

      दरम्यान, या घडामोडींनंतर आरोप-प्रत्यारोपांचा भडिमार सुरू झाला आहे. मंत्री अतुल सावे यांनी “विश्वासघात आम्ही केला नाही” असा दावा करत शिवसेनेवरच आरोपांचा बाण सोडला. तर आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपावर ‘गद्दारी’चा ठपका ठेवत “याचे परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर दिसतील” असा इशारा दिला.

     एकूणच, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाने सत्ता मिळवली असली तरी महायुतीतील फाटलेली वीण आता उघडपणे दिसू लागली आहे. ‘सत्ता सर्वस्व’ या धोरणासाठी भाजप कितीही पुढे जाऊ शकतो, याचे हे ज्वलंत उदाहरण ठरले आहे.

     राज्य पातळीवर मैत्रीची भाषा आणि स्थानिक पातळीवर सत्तेसाठी चाललेली ‘राजकीय कुस्ती’—यामुळे महायुतीचे भविष्य किती भक्कम आहे, हा प्रश्न आता जनतेसमोर उभा राहिला आहे.