इस्लाम काय सांगतो? कोणत्या परिस्थितीत अवयव प्रत्यारोपण (Organ Transplant) मान्य नाही
इस्लाममध्ये मानवी जीवाला अत्यंत उच्च पवित्रता दिली आहे. कुरआन शरीफमध्ये एका जीवाचे रक्षण करणे म्हणजे संपूर्ण मानवजातीचे रक्षण करण्यासारखे आहे असे सांगितले आहे. पण याचबरोबर हा तत्त्वही दिला आहे की मनुष्याने स्वतःला विनाशात ढकलू नये. पैगंबर मोहम्मद ﷺ यांनीही स्पष्ट सांगितले की 'ना स्वतःला हानी पोहोचवावी आणि ना दुसऱ्याला'. या तत्त्वांच्या प्रकाशात इस्लामी फकिहांनी उपचार, शस्त्रक्रिया आणि अवयव प्रत्यारोपणाबाबत काही नियम निश्चित केले आहेत.
इस्लामी शरीयतीचा मूलभूत उद्देश जीवाचे संरक्षण करणे हा आहे. परंतु हे संरक्षण आंधळ्या धोक्याद्वारे नव्हे, तर शहाणपणाने आणि जिथे लाभ अधिक आहे अशा आधारावर असावे. एक फिकही नियम असा आहे की खात्रीचा किंवा प्रबळ तोटा केवळ काल्पनिक किंवा कमकुवत फायद्यासाठी सहन करता येत नाही. त्यामुळे ज्या उपचारांमध्ये मृत्यूचा किंवा गंभीर हानीचा धोका जास्त असेल, ते शरीयतीच्या दृष्टीने शंकास्पद किंवा अमान्य ठरू शकतात.
अवयव प्रत्यारोपण हे तत्त्वतः एक उपचार आहे, पण ते सामान्य उपचारांसारखे नाही. कारण यात एका निरोगी व्यक्तीच्या शरीरातून अवयव काढला जातो. त्यामुळे येथे शरीयतीच्या दृष्टीने दोन जीव आणि दोन शरीरे समोर असतात: एक दाता (Donor) आणि दुसरा रुग्ण (Recipient). शरीयत दोघांच्याही हक्कांचे रक्षण करू इच्छिते; एकाला बळी देऊन दुसऱ्याला वाचवणे हा उद्देश नाही.
ज्या परिस्थितीत अवयव प्रत्यारोपण मान्य नाही, त्यातील पहिली मोठी परिस्थिती म्हणजे दात्याच्या जीवाला किंवा मूलभूत आरोग्याला धोका असणे. जर अवयव काढल्याने दात्याचे आयुष्य प्रभावित होण्याची शक्यता असेल, किंवा तो भविष्यात आजाराला बळी पडू शकतो, तर हे “स्वतःला हानी करू नका” या तत्त्वाच्या विरोधात जाते. केवळ कदाचित दुसऱ्याला फायदा होईल म्हणून दात्याला धोक्यात टाकणे शरीयतीच्या स्वभावाच्या विरोधात आहे.
दुसरी परिस्थिती म्हणजे रुग्ण वाचण्याची वाजवी आशा नसणे. जर तज्ञ डॉक्टरांची टीम या निष्कर्षावर पोहोचली की रुग्णाची अवस्था अशी आहे की शस्त्रक्रियेचा फायदा कमी आहे आणि मृत्यू किंवा गंभीर गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त आहे, तर अशी शस्त्रक्रिया “जीव वाचवणे” नसून जीवाला अधिक धोक्यात टाकणे ठरू शकते. फकिहांनी लिहिले आहे की उपचार तेव्हाच योग्य असतात जेव्हा लाभाची प्रबळ शक्यता असते; आणि जेव्हा तोटा जास्त असेल तेव्हा उपचार टाळले जाऊ शकतात.
तिसरी महत्त्वाची परिस्थिती म्हणजे आर्थिक व्यवहार. अवयव पैशांच्या मोबदल्यात देणे किंवा घेणे बहुतेक फकिहांच्या मते अमान्य आहे. कारण मानवी शरीराचे अवयव व्यापाराची वस्तू बनवणे मानवी प्रतिष्ठेच्या विरोधात आहे. जर गरिबी किंवा मजबुरीमुळे एखादा व्यक्ती आपला अवयव विकण्यास किंवा दान करण्यास तयार झाला, तरी अशी संमती शरीयतीनुसार वैध मानली जात नाही.
आता किडनी प्रत्यारोपणाचे उदाहरण घ्या. वरकरणी असे म्हटले जाते की मनुष्य एका किडनीवरही जगू शकतो. पण प्रत्येक व्यक्तीची शारीरिक अवस्था सारखी नसते. जर दात्याची किडनी काढण्यासाठी मोठी शस्त्रक्रिया करावी लागत असेल, बरगडी कापावी लागत असेल, ऑपरेशननंतर उरलेली किडनी व्यवस्थित काम न करण्याचा धोका असेल, भविष्यात डायलिसिसची वेळ येऊ शकते, आणि आयुष्यभर वैद्यकीय देखरेख आवश्यक असेल, तर हा किरकोळ नव्हे तर कायमस्वरूपी शारीरिक धोका आहे. तज्ञांच्या मते हे धोके असतील तर अशा दात्याला या प्रक्रियेत टाकणे शरीयतीनुसार योग्य मानले जात नाही.
दुसरीकडे रुग्णाची अवस्था पाहिली जाते. जर रुग्ण अत्यंत अशक्त असेल, हृदय फक्त वीस टक्के कार्य करत असेल, शरीरात पाणी साचलेले असेल, मल्टी-ऑर्गन फेल्युअरचा धोका असेल, संसर्गाचा मोठा धोका असेल, आणि डॉक्टरांच्या मते शस्त्रक्रिया अत्यंत धोकादायक असेल, इतकेच नव्हे तर ऑपरेशनदरम्यान किंवा लगेच नंतर मृत्यूची शक्यता जास्त असेल, आणि दात्याची किडनी पूर्ण जुळत नसेल, तर यशाची आशा कमी आणि मृत्यूचा धोका जास्त होतो. अशा स्थितीत हे पाऊल जीव वाचवण्याचा ठोस प्रयत्न नसून दोन जीवांना धोक्यात टाकण्यासारखे ठरू शकते.
इस्लामी तत्त्वानुसार एक जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या जीवाला गंभीर धोक्यात टाकणे योग्य नाही, विशेषतः जेव्हा यशाची शक्यता कमी असते. त्यामुळे जेव्हा दात्याला खात्रीचा किंवा प्रबळ तोटा असेल आणि रुग्णाला फायदा अनिश्चित असेल, तेव्हा अवयव प्रत्यारोपण मान्य केले जात नाही. “चला प्रयत्न करून बघू” हा शरीयतीचा आधार नाही; हे 'उपचारा'पेक्षा 'जुगारा'सारखे बनते. विश्वासार्ह वैद्यकीय तज्ञांच्या मतानुसार रुग्णाला खरोखर फायदा होण्याची प्रबळ शक्यता असणे आवश्यक आहे.
इस्लाम उपचारांना प्रोत्साहन देतो, पण आंधळा धोका पत्करण्याची परवानगी देत नाही. अवयव प्रत्यारोपण तेव्हाच मान्य होऊ शकते जेव्हा दात्याचा धोका मर्यादित आणि सहन करण्याजोगा असेल, रुग्ण वाचण्याची वाजवी व प्रबळ आशा असेल, आणि या प्रक्रियेत मानवी शरीराची प्रतिष्ठा व शरीयतीच्या मर्यादा जपल्या जातील. उलट जेव्हा तोटा जास्त आणि फायदा संशयास्पद असेल, तेव्हा असे प्रत्यारोपण शरीयतीच्या उद्दिष्टांच्या विरोधात ठरते.
• डॉ. रियाज़ुद्दीन देशमुख, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त,
8888836498