पहिल्याच दिवशी एज्युकेशन एक्सपो वादाच्या भोवऱ्यात : बिना टेंडर पार्किंग वसुलीमुळे नागरिक त्रस्त
छत्रपती संभाजीनगर, दि १४ डिसेंबर : आमखास मैदानात सुरू असलेला एज्युकेशन एक्सपो नागरिकांसाठी सुविधा ठरण्याऐवजी डोकेदुखी बनत असल्याचे चित्र आहे. शिक्षणाच्या नावाखाली मोठ्या घोषणा केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात मात्र नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप होत आहे. विशेषतः पार्किंगसाठी कोणताही अधिकृत टेंडर नसताना जबरदस्तीने शुल्क वसूल केले जात असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.
१४ डिसेंबर रोजी अनेक कुटुंबे एज्युकेशन एक्सपो पाहण्यासाठी आमखास मैदानात आली होती. मात्र प्रवेशद्वाराजवळच काही युवकांनी वाहनधारकांना अडवून पार्किंग फीची मागणी केली. पार्किंगचा अधिकृत टेंडर आहे का, अशी विचारणा केली असता “एक्सपोच्या जबाबदारांना विचारा” असे उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले. यावेळी वाद झाला असून, चुकीची भाषा वापरल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
नंतर एक्सपोच्या जबाबदारांशी चर्चा केली असता पार्किंगसाठी कोणताही टेंडर काढण्यात आलेला नसल्याचे समोर आले. एज्युकेशन एक्सपो असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर कुटुंबांची गर्दी होत असते. मात्र प्रवेशद्वारांवरच गोंधळाचे आणि दादागिरीचे वातावरण निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. पार्किंगसाठी ना अधिकृत परवानगी, ना ठरावीक दर, ना मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत.
या प्रकरणाबाबत वक्फचे जबाबदार समीर काझी यांच्याशीही चर्चा करण्यात आली. त्यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे तसेच बिनाटेंडर पार्किंग शुल्क वसुलीसह अन्य अनियमिततांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
एज्युकेशन एक्सपोच्या नावाखाली सुरू असलेली ही खुली लूट थांबवावी आणि वक्फच्या मालमत्तेचा वापर पारदर्शक व नियमांनुसार करावा, अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे.