पैठण गेट ते सिटी चौक रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली
छत्रपती संभाजीनगर: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम महानगरपालिकेने सुरू केली आहे.
आज (दि. २५ ऑगस्ट) पैठण गेट ते सिटी चौक या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. या दरम्यान वाहतुकीला अडथळा करणाऱ्या २५ हातगाड्या जप्त करण्यात आल्या. तसेच ५ ते ६ दुकानांचे ओटे तोडण्यात आले.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार आणि अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. यापुढेही अतिक्रमणाविरोधातील ही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
कारवाईदरम्यान सहायक आयुक्त (अतिक्रमण) संजय सुरडकर, इमारत निरीक्षक मजहर अली, रविंद्र देसाई, सागर श्रेष्ठ, काकनाटे, वाहतूक पोलिस निरीक्षक देवकर, सहायक आयुक्त (वाहतूक) भुजंग तसेच नागरी मित्र पथकाचे कर्मचारी उपस्थित होते.