मित्रच ठरला खुनी! जंगलात मृतदेह, पोलिसांनी 24 तासांत गुन्हा उघड केला
अकोला, २९ मार्च: (प्रतिनिधी- जी एम देशमुख): अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात एका तरुणाच्या खुनाची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासांत गुन्ह्याचा छडा लावून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
दि. 26 मार्च 2026 रोजी दुपारच्या सुमारास बाळापूर तालुक्यातील रिधोरा शिवारातील जंगलालगतच्या शेतातील दुर्गम भागात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी, बाळापूर विभाग, तसेच स्थानिक गुन्हे शाखा अकोला आणि बाळापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात हा मृत्यू संशयास्पद असल्याचे लक्षात आल्यानंतर हत्या झाल्याची शक्यता गृहित धरून तपासाला वेग देण्यात आला.
पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वाखाली तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. मृतदेहाची अवस्था खराब असल्याने ओळख पटविणे कठीण होते. मात्र, कपडे आणि इतर वस्तूंच्या आधारे तपास करत अखेर मृताची ओळख सचिन बाल्मिक खंडारे (वय 21, रा. अमानतपूर (ताकोडा), ता. बाळापूर, जि. अकोला) अशी पटली.
यानंतर पोलिसांनी मृताच्या मित्रपरिवाराची चौकशी केली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये सचिन हा 25 मार्चच्या रात्री अभिषेक प्रकाश गवळी (वय 24, रा. हातरुन, ता. बाळापूर, जि. अकोला) याच्यासोबत मोटारसायकलवर जाताना दिसला. पोलिसांनी अभिषेक गवळी याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. वैयक्तिक वादातून त्याने सचिनचा खून केल्याचे उघड झाले.
तपासादरम्यान आणखी एक आरोपी आदेश सुधीर डोंगरे (रा हातरुन, जि. अकोला) याचा सहभाग समोर आला. त्यालाही ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या नेतृत्वाखाली स.पो.नि. विजय चव्हाण, पो.उप.नि. गोपाल जाधव, विष्णू बोळखे, माजिद पठाण तसेच अमलदार शेख हसन, अब्दुल माजिद, वसीमोद्दीन, किशोर सोनवणे, रविंद्र खंडारे, महेंद्र मलीये, भास्कर धोत्रे, श्रीकांत पातोंड, अशोक सोनवणे, राहुल गायकवाड, भिमराव दिपके, प्रशांत कमलाकर आणि देवानंद खरात यांनी विशेष मेहनत घेतली.
या जलद कारवाईमुळे स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक होत असून, गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा मिळावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.