अबू आझमींच्या मागणीनंतर SIR घरोघर पडताळणी मोहिमेला १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा निर्णय
मुंबई, दि. ४ ऑगस्ट : महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकन (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेतील बीएलओ (Booth Level Officer) यांच्या घरोघरी जाऊन मतदार पडताळणी करण्याच्या मोहिमेला भारत निवडणूक आयोगाने १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. आयोगाने मंगळवारी सुधारित वेळापत्रक जाहीर करून राज्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आसिम आझमी यांनी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांची प्रत्यक्ष भेट घेऊन SIR प्रक्रियेमुळे मतदार आणि बीएलओ यांना येणाऱ्या अडचणींची सविस्तर माहिती दिली होती. पावसाळा, कमी कालावधी, कागदपत्रांची पूर्तता आणि घरोघरी पडताळणीतील व्यावहारिक अडचणी लक्षात घेऊन SIR प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी त्यांनी केली होती.
त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत निवडणूक आयोगाने सुधारित वेळापत्रक जाहीर करून घराघर पडताळणीची मुदत १७ ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. समाजवादी पक्षाने हा निर्णय आपल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित असल्याचा दावा केला आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार ३० जूनपासून सुरू असलेली बीएलओंची घरोघरी पडताळणी मोहीम आता १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रकाशित केला जाईल. मसुद्यावर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येतील. दावे-हरकतींची सुनावणी व निकाली काढण्याची प्रक्रिया २२ ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करून २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाने सुधारित वेळापत्रकाची माहिती सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि राजकीय पक्षांना देण्याचे निर्देश दिले असून, त्याची व्यापक प्रसिद्धी करण्याचेही आदेश दिले आहेत.
समाजवादी पक्षाने या निर्णयाचे स्वागत करताना, मतदार आणि बीएलओ यांच्या अडचणी वेळेत निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळेच हा निर्णय शक्य झाला, असा दावा केला आहे. तसेच उर्वरित कालावधीत प्रत्येक पात्र मतदाराची नोंद अचूकपणे व्हावी आणि कोणताही मतदार वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावीपणे काम करावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.