आरेगाव येथे भव्य शिक्षण परिषद उत्साहात संपन्न; अध्यापनात AI चा वापर, बालकेंद्रित शिक्षण व गुणवत्तापूर्ण अध्यापनावर भर

आरेगाव येथे भव्य शिक्षण परिषद उत्साहात संपन्न; अध्यापनात AI चा वापर, बालकेंद्रित शिक्षण व गुणवत्तापूर्ण अध्यापनावर भर

डोणगांव, ३० जुलै (मो. ऐहफाज़ ग़ाज़ी कडून): जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, आरेगाव येथे डोणगाव केंद्राची भव्य शिक्षण परिषद अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली. शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाला चालना देणे, अध्यापन अधिक प्रभावी व विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी नव्या संकल्पना, अध्यापनातील नावीन्यपूर्ण क्लुप्त्या तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा शैक्षणिक क्षेत्रात प्रभावी वापर यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर या परिषदेत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

     परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख श्री ढवळे सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वर्षा लांभाडे मॅडम, जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा डोणगावचे मुख्याध्यापक मोहम्मद जाकीर सर, कन्या शाळेचे शिक्षक व माजी मुख्याध्यापक श्री गोपालराव लांभांडे, प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री डोंगरदिवे सर, कऱ्हाळवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री दीपक दिवठाणे सर तसेच यजमान शाळेचे मुख्याध्यापक श्री जुमडे सर मंचावर उपस्थित होते. डोणगाव केंद्रातील सर्व शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने या परिषदेस उपस्थित होते.

      कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विविध तज्ज्ञांनी अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी आवश्यक असलेल्या संकल्पना, आधुनिक अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याच्या क्लुप्त्या तसेच वर्गशिक्षणात AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याविषयी मार्गदर्शन केले. बदलत्या काळानुसार शिक्षकांनी तंत्रज्ञानाशी मैत्री करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

      अध्यक्षीय मनोगतात केंद्रप्रमुख श्री ढवळे सर यांनी सांगितले की, "आपल्या अध्यापनाच्या केंद्रस्थानी नेहमी बालक असले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हीच शिक्षकांची खरी जबाबदारी आहे. प्रत्येक शिक्षकाने जीव ओतून विद्यार्थ्यांसाठी कार्य केले, तर त्याचे सकारात्मक प्रतिबिंब संपूर्ण शैक्षणिक सत्रात निश्चितच दिसून येईल." त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

      कार्यक्रमादरम्यान हनुमान इंगळे सर तसेच नागापूर उर्दू शाळेच्या शिक्षिका हुमेरा मॅडम यांनी शिक्षण परिषदेसंदर्भात मनोगत व्यक्त करताना अशा परिषदांमुळे शिक्षकांना नवे ज्ञान, प्रेरणा आणि अध्यापनात नावीन्य आणण्याची ऊर्जा मिळत असल्याचे सांगितले.

      कार्यक्रमाचे प्रभावी प्रास्ताविक श्री जुमडे सर यांनी केले. त्यांनी शिक्षण परिषदेचे उद्दिष्ट, शाळेची वाटचाल आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. तर श्री दीपक दिवठाणे सर यांनी आभार प्रदर्शन करत उपस्थित सर्व शिक्षक, मान्यवर व आयोजकांचे आभार मानले आणि अशा उपक्रमांमुळे शिक्षकांमध्ये सकारात्मक स्पर्धा व गुणवत्तावृद्धीला चालना मिळत असल्याचे नमूद केले.

      या शिक्षण परिषदेत शैक्षणिक गुणवत्तेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शाळा व शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला. विशेषतः जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा, डोणगाव येथील स्कॉलरशिप परीक्षेत तब्बल २० विद्यार्थी पात्र ठरल्याबद्दल त्या शाळेतील शिक्षकांचा सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. तसेच नवोदय परीक्षेतील उल्लेखनीय यश, शैक्षणिक गुणवत्तावाढ आणि चालू शैक्षणिक सत्रात पटसंख्या वाढविण्यात यशस्वी ठरलेल्या शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचाही सन्मान करण्यात आला.

      कार्यक्रमाच्या शेवटी आरेगाव शाळेच्या वतीने सर्व उपस्थितांसाठी स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेत परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

      शिक्षकांच्या चेहऱ्यावरील उत्साह, समाधान आणि नव्या शैक्षणिक वर्षासाठीचा सकारात्मक दृष्टिकोन पाहून यजमान शाळेचे मुख्याध्यापक श्री जुमडे सर यांनी आनंद व्यक्त केला. डोणगाव केंद्रात प्रथमच इतक्या व्यापक स्वरूपात आयोजित करण्यात आलेली ही शिक्षण परिषद शिक्षकांसाठी प्रेरणादायी, ज्ञानवर्धक आणि संस्मरणीय ठरली. उपस्थितांच्या मते, "ना भूतो, ना भविष्यति" अशा स्वरूपाची ही शिक्षण परिषद भविष्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.