न्याय मिळवून देणारे खरे योद्धे! ॲड. सईद शेख, व ॲड.फय्याज पटेल यांच्या लढ्याला यश – आकेफाच्या कुटुंबाला २७ लाखांची भरपाई

न्याय मिळवून देणारे खरे योद्धे! ॲड. सईद शेख, व ॲड.फय्याज पटेल यांच्या लढ्याला यश – आकेफाच्या कुटुंबाला २७ लाखांची भरपाई

छत्रपती संभाजीनगर, २९ मार्च: अन्यायाविरुद्ध ठाम उभे राहत न्याय मिळवून देणाऱ्या वकिलांचा जाज्वल्य लढा पुन्हा एकदा यशस्वी ठरला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थीनी आकेफा मेहरीन हिच्या २०१९ मधील दुर्दैवी अपघाती मृत्यू प्रकरणात मोटार अपघात न्यायाधिकरणाने तिच्या आई-वडिलांना तब्बल २७ लाख ५६० रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. या विजयामागे ॲड.  सईद शेख आणि ॲड.फय्याज पटेल यांची कायदेशीर लढाई निर्णायक ठरली.

     आरेफ कॉलनी, औरंगाबाद येथील रहिवासी (मुळ रा. कळमनुरी, जि. हिंगोली) मोहम्मद जहीर मोहम्मद आजम आणि नसीमबेगम मोहम्मद जहीर यांची कन्या आकेफा मेहरीन ही अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. २२ एप्रिल २०१९ रोजी दुपारी ती तिच्या मोपेडने (क्र. MH 20 CE 9288) भडकल गेटकडे जात असताना, जामा मस्जिदकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (क्र. MH 02 CB 2079) तिच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही कार सिटी चौक पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक संतोष रामदास पाटे चालवत होता. या भीषण अपघातात आकेफाच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आणि २४ एप्रिल २०१९ रोजी पहाटे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

     या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्य लपवता आले नाही. चौकशीत स्वतः सिटी चौक पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक संतोष पाटेच अपघाताला जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले. तरीही त्याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात घडल्याने पाटेला जाणीवपूर्वक क्लिनचिट देण्यात आली. हा उघड अन्याय सहन न करता आकेफाच्या वडिलांनी न्यायासाठी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दरवाजे ठोठावले.

     याच वेळी मैदानात उतरले ते न्यायासाठी झटणारे खरे लढवय्ये – ॲड. सईद शेख आणि ॲड.फय्याज पटेल  त्यांनी केवळ कायदेशीर लढा दिला नाही, तर प्रत्येक टप्प्यावर ठोस पुरावे, प्रभावी युक्तिवाद आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निवाड्यांचा आधार घेत प्रकरणाला योग्य दिशा दिली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे खंडपीठाने गंभीर दखल घेतली आणि दोन वर्षांनी संतोष पाटे याच्याविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र सादर करण्यात आले.

     नुकसानभरपाई प्रकरणात न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने “मयत अल्पवयीन होती व तिने विनापरवाना वाहन चालवले” असा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र ॲड.  सईद शेख आणि ॲड.फय्याज पटेल   यांनी हा युक्तिवाद न्यायालयात प्रभावीपणे खोडून काढला. त्यांच्या धारदार मांडणीसमोर विमा कंपनीसह वाहन मालक अरुण रामदास पाटे आणि चालक संतोष रामदास पाटे यांची बाजू कमकुवत ठरली.

     अखेर मोटार अपघात न्यायाधिकरणाने सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निवाड्यांचा आधार घेत विमा कंपनी, वाहन मालक आणि चालक यांना संयुक्तपणे आकेफाच्या आई-वडिलांना २७ लाख ५६० रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. हा निर्णय केवळ एका कुटुंबाला दिलासा देणारा नसून, अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

       या प्रकरणातून एक गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली – न्याय उशिरा मिळाला तरी तो मिळवून देण्यासाठी काही जिद्दी योद्धे असतात, आणि ॲड.  सईद शेख आणि ॲड.फय्याज पटेल   हे त्यातीलच एक भक्कम नाव आहे!