गुन्हेगारीच्या विळख्यात संभाजीनगर; 'अलायन्स अगेन्स्ट क्राईम'ची निर्णायक मोहीम!
छत्रपती संभाजीनगर,१ ऑगस्ट : छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या काही महिन्यांपासून खून, अमली पदार्थांची तस्करी, टोळीगिरी, अवैध शस्त्रांचा वापर आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये होत असलेल्या वाढीमुळे नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. कायद्याचे राज्य अधिक प्रभावीपणे प्रस्थापित करून शहराला गुन्हेगारीच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी 'अलायन्स अगेन्स्ट क्राईम' या नागरिकांच्या संघटनेने पुढाकार घेत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
निवेदनामध्ये शहरातील गंभीर गुन्ह्यांच्या तपासाला गती देणे, निर्धारित कालमर्यादेत तपास पूर्ण करून भक्कम पुराव्यांसह दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करणे, अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कठोर कारवाई करणे, सराईत गुन्हेगारांवर सातत्याने देखरेख ठेवणे, संवेदनशील भागात रात्रीची गस्त वाढविणे, सीसीटीव्ही, गुप्त माहिती यंत्रणा आणि बीट व्यवस्था अधिक सक्षम करणे अशा महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या आहेत.
याशिवाय शहरातील सर्व लक्झरी ट्रॅव्हल्स व बस ऑपरेटरांची बैठक घेऊन संशयास्पद प्रवासी किंवा पार्सलची माहिती तात्काळ पोलिसांना देणे बंधनकारक करावे, यासाठी स्वतंत्र मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करावी, तसेच अमली पदार्थांच्या तस्करीत कोणत्याही ट्रॅव्हल्सची संलग्नता अथवा गंभीर निष्काळजीपणा सिद्ध झाल्यास संबंधित परवाना रद्द करण्याची शिफारस करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहीम, टोळीगिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई, युवकांसाठी अमली पदार्थविरोधी जनजागृती, समुपदेशन व हेल्पलाइन अधिक सक्षम करणे तसेच खून, अमली पदार्थ आणि संघटित गुन्हेगारीविरोधातील पोलिस कारवाईचा मासिक सार्वजनिक अहवाल प्रसिद्ध करण्याचीही मागणी करण्यात आली.
विशेष म्हणजे, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत प्रतिनिधीमंडळाशी सकारात्मक चर्चा केली. शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी नागरिकांच्या सूचनांचे स्वागत असून, आवश्यक त्या मुद्द्यांवर प्रभावी कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती प्रतिनिधींनी दिली.
'अलायन्स अगेन्स्ट क्राईम'चा हा पुढाकार कौतुकास्पद मानला जात आहे. केवळ टीका न करता पोलिस प्रशासनासमोर अभ्यासपूर्ण आणि रचनात्मक मागण्या मांडून शहरातील शांतता, सुरक्षितता आणि कायद्याचे राज्य अधिक मजबूत करण्यासाठी संघटनेने उचललेले पाऊल हे नागरिकांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारे आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अशा सामाजिक उपक्रमांमुळे पोलिस आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होण्यास निश्चितच मदत होईल.
या प्रतिनिधीमंडळात जमील फारुकी, आदिल मदनी, अन्वारुल हक ईशाअती, नौशाद कुरेशी, आमिर खान, अब्दुल राफे, मुस्तफा खान, सय्यद तनवीर, फिरोज पठाण, अब्दुल बासित सिद्दीकी, सय्यद इरशाद अली, हुजैफा खान, मुर्तुजा खान, जलीस अहमद, मुजफ्फर सिद्दीकी, मोहम्मद सद्दाम, शेख फैजान, परवेज खान, आदनान काशीफ, माज सिद्दीकी, ॲड. मोहम्मद बिलाल, असरार फारुकी, उस्मान, इमरान खान, मुस्तफा खान, अमीर अल्कसेरी, फिरोज पठाण आदींचा समावेश होता.
शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा कोणत्याही एका संस्थेचा किंवा प्रशासनाचा नसून संपूर्ण समाजाचा आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करणे आणि नागरिकांनीही जागरूक सहकार्य करणे, ही काळाची गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
