कर्जवसुलीच्या नावाखाली महिला वकिलेला अश्लील कॉल; : बोगस कॉल सेंटरचा भांडाफोड
छत्रपती संभाजीनगर/नाशिक – राज्यभरातील कर्जदारांच्या महिला नातेवाईकांना अश्लील कॉल करून व धमक्या देत पैसे उकळणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका महिला वकिलाने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना अटक करून २४ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
महिला वकिलेला धमकीचे कॉल
छत्रपती संभाजीनगरमधील एका ३१ वर्षीय महिला वकिलेला १५ सप्टेंबर रोजी धमकीचा कॉल आला. एका महिलेकडून घेतलेल्या कर्जाच्या संदर्भात तीच जबाबदार असल्याचे सांगून कॉल करणाऱ्यांनी शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर, संबंधित कर्जदार महिलेला कॉन्फरन्स कॉलवर घेऊनही वकिलेला अपमानास्पद भाषेत बोलण्यात आले. वकिलांच्या घराजवळील अनेक महिलांनाही असे अश्लील व त्रासदायक कॉल येऊ लागले. यामुळे संतप्त वकिलाने थेट सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्याकडे तक्रार दाखल केली.
इगतपुरीत बोगस कॉल सेंटरचा शोध
सायबर पोलिसांनी तक्रारीतील क्रमांकांचा माग काढला असता सर्व कॉल इगतपुरी येथून होत असल्याचे उघड झाले. त्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधून संयुक्त कारवाई करण्यात आली. सोमवारी संध्याकाळी इगतपुरीतील मीनाताई ठाकरे संकुलात धाड टाकण्यात आली. तेथे बेकायदेशीररीत्या चालणारे कर्जवसुलीचे कॉल सेंटर आढळून आले.
दोन आरोपी पोलिस जाळ्यात
या कारवाईत पोलिसांनी नरेंद्र शशिकांत भोंडवे (३२, रा. इगतपुरी) व पारस संजय भिसे (२६, रा. घाटकोपर, मुंबई) या दोघांना ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या ताब्यातून मोबाईल, सीमकार्ड, लॅपटॉप आदींसह २४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई इगतपुरी पोलिस ठाण्याच्या निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या पथकाने केली.
असे चालायचे रॅकेट
या कॉल सेंटरमध्ये ४० ते ५० कर्मचारी कार्यरत होते. राज्यातील नामांकित बँका व पतसंस्थांच्या नावाखाली ते कर्जदारांशी व त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधत. सोशल मीडियावरील मित्रपरिवारासह विविध लोकांना फोन करून धमकावले जाई. बँकेच्या बनावट ओळखीचा आधार घेत अशा कॉलद्वारे पैसे उकळले जात होते. आरोपींकडे कर्जदारांचा वैयक्तिक डेटा बेकायदेशीरपणे संकलित केलेला असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षकांची माहिती
या कारवाईची माहिती नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की, “कर्जदारांना धमकावून पैसे उकळणाऱ्या बोगस कॉल सेंटरविरुद्ध कडक कारवाई सुरू राहील. अशा प्रकारच्या तक्रारी तत्काळ पोलिसांकडे कराव्यात.”