NEET घोटाळ्यावरून मोटेगावकराच्या ‘RCC’वर NSUIचा हल्लाबोल; मराठवाड्यातील सर्व शाखा बंद करण्याची मागणी!
छत्रपती संभाजीनगर : नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी आणि कथित घोटाळ्याच्या प्रकरणावरून छत्रपती संभाजीनगरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात ‘RCC नीट क्लासेस’वर तात्काळ पूर्णपणे बंदी घालावी, तसेच छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यातील या संस्थेच्या शाखांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI)ने केली आहे. यासंदर्भात NSUIच्या शिष्टमंडळाने आज विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले.
NEETसारख्या देशातील अत्यंत महत्त्वाच्या प्रवेश परीक्षेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवित्यावर परिणाम होतो. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नये, अशी भूमिका NSUIने घेतली आहे.
NSUIचे जिल्हाध्यक्ष अभिषेक शिंदे पाटील यांनी या प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधताना सांगितले की, केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईदरम्यान RCC नीट क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना NEET परीक्षा पेपरफुटी आणि कथित घोटाळ्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर संबंधित संस्थेच्या कारभाराची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
NEET पेपरफुटी प्रकरणात सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न होणाऱ्या व्यक्तींवर कठोर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी NSUIने केली आहे. परीक्षा घोटाळ्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
दरम्यान, देशभरातील परीक्षा घोटाळ्यांमध्ये दोषी आढळलेल्या संस्थांवर कारवाई करण्याबरोबरच RCC नीट क्लासेसच्या छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यातील शाखांवर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या गंभीर प्रकरणात प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कठोर पावले उचलली नाहीत, तर NSUIच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नावर प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी NSUIने केली आहे.