भारताचे तुम्ही खरे भूमिपुत्र आहात; आपण मूलनिवासी आहोत’ : पतंगराव खोकले

भारताचे तुम्ही खरे भूमिपुत्र आहात; आपण मूलनिवासी आहोत’ : पतंगराव खोकले

डोणगाव, दि. ९ ऑगस्ट (प्रतिनिधी : शेख अहेफाज़ ग़ाजी) — ‘भारताचे तुम्ही खरे भूमिपुत्र आहात, तुम्ही मूलनिवासी आहात’ ही भावना प्रत्येक आदिवासी, अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीयांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. आदिवासी समाज हा वनवासी नसून या देशाचा खरा भूमिपुत्र आहे, अशी जाणीव समाजामध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. आपले संविधान, घटनात्मक अधिकार आणि हक्क समजून घेऊन ते अबाधित राखण्यासाठीच्या व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्यात आदिवासी समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय आदिवासी कर्मचारी संघाचे राज्य अध्यक्ष पतंगराव खोकले यांनी केले.

     राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने विश्व मूलनिवासी (आदिवासी) दिनानिमित्त डोणगाव येथे आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करताना खोकले बोलत होते. यावेळी त्यांनी आदिवासी समाजाने आपल्या इतिहासाची, संविधानिक अधिकारांची आणि सामाजिक भूमिकेची जाणीव ठेवून संघटित होण्याची गरज व्यक्त केली.

     खोकले म्हणाले की, आदिवासी समाजाला केवळ ‘वनवासी’ म्हणून संबोधण्यापेक्षा त्याची या भूमीशी असलेली ऐतिहासिक नाळ आणि संविधानाने दिलेले अधिकार समजून घेणे महत्त्वाचे आहे. आपण या देशाचे मूलनिवासी आहोत आणि देशाच्या व्यवस्थेत आपली भूमिका महत्त्वाची आहे, ही आत्मभानाची भावना समाजात रुजली पाहिजे. आपल्या हक्कांसाठी आणि संविधानाच्या संरक्षणासाठी संघटित संघर्ष उभारण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘मूलनिवासी दिन शासनस्तरावर साजरा का होत नाही?’
     यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे राज्य कार्याध्यक्ष भागवत जाधव यांनीही सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले. जगातील अनेक देशांमध्ये मूलनिवासी दिन शासनस्तरावर साजरा केला जातो; मात्र भारतात हा दिवस शासनस्तरावर व्यापकपणे का साजरा होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

     भारतातील बहुजन समाजाच्या हातात सत्तेची सूत्रे नसल्यामुळे त्यांच्यासमोरील सामाजिक प्रश्न कायम असल्याचा दावा जाधव यांनी केला. देशातील बहुजन समाजाने संघटित होऊन देशव्यापी व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्यात सहभागी व्हावे आणि त्यातून सामाजिक विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

     यावेळी आर. आर. शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक प्रबोधनाची आवश्यकता अधोरेखित केली.

आदिवासी समाज भूषण’ पुरस्काराने सुकनंदन हांडे यांचा गौरव
     कार्यक्रमात सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे मा. सुकनंदन विठोबा हांडे, मुख्याध्यापक यांचा विशेष सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने ‘आदिवासी समाज भूषण पुरस्कार २०२६’ देऊन मान्यवरांच्या हस्ते हांडे यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला.

     फुले, शाहू, आंबेडकर आणि बिरसा मुंडा यांच्या विचारांचा प्रसार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी हांडे करीत असलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. पुरस्कार स्वीकारताना हांडे यांनी सामाजिक प्रबोधनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त केला.

     डोणगावात पहिल्यांदाच आदिवासी युवकांची भव्य मोटारसायकल रॅली
विश्व मूलनिवासी दिनाचे औचित्य साधून भागवत जाधव यांच्या नेतृत्वाखाली डोणगाव शहरात प्रथमच आदिवासी युवकांची भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. मादणी फाट्यापासून कार्यक्रमस्थळापर्यंत निघालेल्या या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने आदिवासी युवक सहभागी झाले होते.

     रॅलीतील मोटारसायकलींची लांबच लांब रांग, सहभागी युवकांचा उत्साह आणि विश्व मूलनिवासी दिनाचा संदेश यामुळे रॅलीने डोणगावकरांचे विशेष लक्ष वेधून घेतले. आदिवासी समाजाच्या एकजुटीचे आणि नव्या पिढीच्या सहभागाचे दर्शन या रॅलीतून घडले.

     कार्यक्रमाला राष्ट्रीय आदिवासी कर्मचारी संघाचे राज्य अध्यक्ष पतंगराव खोकले, भारत मुक्ती मोर्चाचे राज्य कार्याध्यक्ष भागवत जाधव, आर. आर. शिंदे, राष्ट्रीय आदिवासी कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष राजू जामकर, हरीदास मिरासे तसेच आदिवासी समाजातील महिला, पुरुष आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय आ लल तर.दिवासी कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष राजू जामकर यांनी केले, तर.तर आभार प्रदर्शन हरीदास मिरासे यांनी केले.

     विश्व मूलनिवासी दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे डोणगावात आदिवासी समाजाच्या सामाजिक एकजुटीचा आणि वैचारिक प्रबोधनाचा जागर पाहायला मिळाला