जामनेर मॉब लिंचिंगचा तपास CID कडे द्या; SIT गठीत करा – छत्रपती संभाजीनगर समाजवादी पक्षाची मागणी

जामनेर मॉब लिंचिंगचा तपास CID कडे द्या; SIT गठीत करा – छत्रपती संभाजीनगर समाजवादी पक्षाची मागणी

छत्रपती संभाजीनगर, दि. 19 ऑगस्ट : जलगाव जिल्ह्यातील जामनेर येथे घडलेल्या सुलेमान खान  यांच्या अमानुष मोब लिंचिंग प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच पीडित कुटुंबाला शासनाकडून मदत मिळावी, या मागणीसाठी समाजवादी पक्ष छत्रपती संभाजीनगर तर्फे मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांना विभागीय आयुक्तांमार्फत निवेदन देण्यात आले.

       निवेदनात म्हटले आहे की, सुलेमान यांची निर्दयपणे जमावाकडून हत्या करण्यात आली. ही घटना केवळ एका कुटुंबावर अन्याय करणारी नाही तर संपूर्ण समाजाच्या अंत:करणाला धक्का देणारी आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक सौहार्दाला काळीमा फासणारी  ही घटना असून त्यामुळे दोषींवर तात्काळ कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

        समाजवादी पक्षाने स्पष्ट केले आहे की, या घटनेत केवळ खून करण्याचा उद्देश नव्हता, तर सार्वजनिक ठिकाणी अल्पसंख्यांक समाजामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणे हा देखील उद्देश होता. त्यामुळे या कृत्याला दहशतवादी कृत्य मानून आरोपींवर अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन एक्ट (यूएपीए) नुसार गुन्हा दाखल करावा. तसेच या आरोपींपैकी अनेकांवर पूर्वीही गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मोक्का कायदाही लागू करावा.

        याशिवाय स्थानिक पोलिसांवर राजकीय दबाव असल्यामुळे प्रमुख आरोपी पावन बावस्कर मोकाट फिरत असून पोलिस त्याला अटक करण्यास धजावत नाहीत, असे आरोपही समाजवादी पक्षाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास सीआयडी कडे वर्ग करून विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करावे आणि त्यावर पोलीस अधीक्षक दर्जाच्या आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

         पीडित कुटुंबाला मदत मिळावी म्हणून मृतकाच्या नातेवाईकांना शासनाकडून किमान एक कोटी रुपयांची भरपाई द्यावी, कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी, प्रकरणाचा निकाल लवकर लागण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करून जलद गतीने खटला चालवावा तसेच या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील नेमावा, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

         याप्रसंगी अजमत खान मुनीर खान (अध्यक्ष, छत्रपती संभाजी नगर पूर्व विधानसभा), अब्दुल रऊफ (प्रदेश महासचिव), डॉ. रियाजोद्दीन देशमुख (प्रदेश सचिव), शेख अय्युब पटेल (महानगर अध्यक्ष), प्रीती दुबे (जिल्हा महिला अध्यक्ष), शेख शोएब (महानगर प्रमुख महासचिव), सलमान मिर्झा (महानगर युवा अध्यक्ष), सिमा मॅडम (महिला महानगर अध्यक्ष), अयाज खान (महानगर महासचिव), एड. शेख गुफरान अहमद (महानगर महासचिव), शेख अब्दुल कय्यूम (महानगर कोषाध्यक्ष), शेख इम्रान (सोशल मीडिया अध्यक्ष) तसेच शौकील, सय्यद अरीसग (पश्चिम विधानसभा अध्यक्ष),  रिजवान (उपाध्यक्ष – युवा जनसभा) यांसह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

         समाजवादी पक्षाने इशारा दिला आहे की, जर या मागण्या तातडीने मान्य झाल्या नाहीत, तर संविधानिक मार्गाने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून दिला जाईल.