वक्फ मंडळाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात! 'लिलावात घोटाळा, इनामी जमिनींवर बेकायदा कब्जे'; ISLAM पार्टीचा वक्फ मंडळाला इशारा

वक्फ मंडळाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात! 'लिलावात घोटाळा, इनामी जमिनींवर बेकायदा कब्जे'; ISLAM पार्टीचा वक्फ मंडळाला इशारा

छत्रपती संभाजीनगर, १३ जुलै | (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दर्गाह कवडे शहा साहब (घास मंडी, सिटी चौक) येथील वक्फ मालमत्तेच्या लिलावातील  गैरव्यवहार आणि जिल्ह्यातील वक्फ मंडळाच्या इनामी जमिनींवरील संशयास्पद कारभारामुळे मंडळाची कार्यपद्धतीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. I.S.L.A.M. पार्टीच्या शिष्टमंडळाने सोमवारी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी फैयाज अहमद खान यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करत या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. दोषींवर फौजदारी कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

     दर्गाह कवडे शहा साहब येथील लिलाव प्रक्रियेत अनेक गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. प्रकाशित होत नसलेल्या वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देण्यात आल्याचा, जाहिरातीत नमूद केलेल्या क्षेत्रफळापेक्षा वेगळ्या क्षेत्रफळाचा लिलाव करण्यात आल्याचा, मौल्यवान वक्फ मालमत्ता अत्यल्प दराने भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचा तसेच ११ महिन्यांची लीज संपल्यानंतरही संबंधितांकडून जागेचा ताबा परत न घेता त्यांना लाभ मिळू दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वी तक्रारी करण्यात आल्याचा दावा असूनही संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रभावी कारवाई केली नसल्याने संशय अधिकच गडद झाला असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

     याहूनही गंभीर बाब म्हणजे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या थेट अखत्यारीतील सुमारे ३० इनामी जमिनींच्या लावणी लिलावाला मागील तीन-चार वर्षांपासून प्रतिसाद नसल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात अनेक जण त्या जमिनींवर शेती करून पिके घेत आहेत आणि बेकायदेशीर ताबा कायम ठेवत आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. जर लिलावात कोणी सहभागीच झाले नाही, तर या जमिनींवर शेती कोणाच्या परवानगीने सुरू आहे? या प्रश्नाचे उत्तर वक्फ प्रशासनाकडे नसल्याची टीका करण्यात आली.

     या संपूर्ण प्रकरणात जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप I.S.L.A.M. पार्टीने केला आहे. जमिनींवरील अनधिकृत ताबे त्यांच्या निदर्शनास असूनही अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली नाही, वरिष्ठ कार्यालयाला वस्तुस्थिती कळविण्यात आली नाही आणि उलट या सर्व प्रकरणात आर्थिक व्यवहार झाल्याची गंभीर माहिती समोर येत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर शिस्तभंग, फौजदारी कारवाई तसेच सेवेतून बडतर्फीची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

     निवेदनात दर्गाह कवडे शहा साहब येथील कथित घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी, बेकायदेशीर लीज रद्द करून मालमत्तेचा ताबा वक्फ मंडळाकडे घेणे, जिल्ह्यातील सर्व इनामी जमिनींची विशेष तपासणी करून अनधिकृत ताबे हटविणे, आर्थिक नुकसानीची वसुली करणे तसेच संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

     यावेळी इस्लाम पार्टीचे पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी फैयाज अहमद खान यांच्याबद्दल आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला की त्यांची कायमस्वरूपी (फुल-टाईम) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती असूनही ते नियमितपणे मुख्यालय असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथे उपस्थित राहत नाहीत.  राज्यभरातून कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट मिळत नसल्याने प्रशासनाविषयी नाराजी वाढत आहे. "मुख्यालय छत्रपती संभाजीनगर असताना मुंबईत बसून कारभार चालविणे योग्य नाही. वक्फ मंडळाचा कारभार मुख्यालयातूनच चालला पाहिजे," असे इस्लाम पार्टीचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

     मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे निवेदन शहराध्यक्ष रफत यार खान यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी शहर उपाध्यक्ष अझहर पठाण, युवक शहराध्यक्ष अबुल हसन हाश्मी, प्रवक्ता आरिफ हुसेनी, शहर कार्याध्यक्ष अझहर खान, महिला विंग शहराध्यक्ष शकीला पठाण, पूर्व विभाग शहराध्यक्ष अफसर पठाण, युवक शहर कार्याध्यक्ष जलील खान, अल्पसंख्यांक विंग अध्यक्ष फैसल मिर्झा, युवक मध्य विभाग उपाध्यक्ष शेख मुश्ताक, पूर्व विभाग उपाध्यक्ष रेहान राणा यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

     I.S.L.A.M. पार्टीने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, या गंभीर आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन, निदर्शने आणि कायदेशीर लढा उभारण्यात येईल. वक्फ मालमत्तेच्या संरक्षणासाठी निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ प्रशासनाची असेल, असा इशाराही पक्षाने दिला आहे.