अमेरिकेचा ‘हाऊडी’ झाला ‘आउटी’, भारतीयांचा काढता पाय!

अमेरिकेचा ‘हाऊडी’ झाला ‘आउटी’, भारतीयांचा काढता पाय!

        सध्या अमेरिकेत एक भन्नाट तमाशा सुरू आहे. ट्रम्पबाबांनी ठरवलंय की आता त्यांच्या देशात अनधिकृत भारतीयांचा नंबर लागलाय! अरे, तुम्हीच तर ह्यांना बोलावलं होतं! ह्याच भारतीयांनी "हाऊडी मोदी" मध्ये नाचून तुम्हाला लय भारी वाटायला लावलं होतं, मग आता त्यांच्यावरच लाथ घालता?
मोदीजी जेंव्हा अमेरिकेला जायचे तेंव्हा विमानतळावर लोक ताट वाजवत उभे राहायचे, "भारत माता की जय!" ओरडायचे. पण आता? आता तेच बिचारे परत पाठवले जातायत, आणि मोदीजींच्या तोंडून साधं "हम आपके साथ है" एवढंही ऐकू येत नाही! का? कारण अमेरिकेत "हाऊडी" च्या ऐवजी आता "आउटी" सुरू झालंय!

          काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या सरकारी कार्यालयांमध्ये भारतीयच भारतीय दिसायचे. H1B व्हिसाने अमेरिकेचा आयटी विभाग बळकावला होता, आणि भारतीय "कोडिंग गुरू" लोक अमेरिकन बॉस लोकांना सांगत होते की "सर, यु शुड रीबूट इट!" आता हेच कोडिंग मास्टर ट्रम्पबाबांच्या डिलीट यादीत आलेत.

          २०२३ मध्ये जवळपास ९०,००० भारतीय अमेरिकेत जायला निघाले होते, पण अमेरिकेच्या सीमा रक्षकांनी त्यांना "तुमचा पासवर्ड चुकीचा आहे!" असं सांगून परत पाठवलं. आता अमेरिकेतील साडेसात लाख अनधिकृत भारतीय धडधडत्या काळजाने बसलेत – "आपली डिलीट की कधी दाबली जाईल?"

          मोदीजी भारतात "लाल आंखें" करून चीनला घाबरवायचे, पण आता अमेरिकेने १८,००० भारतीय परत पाठवायचं ठरवलं तर त्यांचीच नजर झुकली! आधी म्हणायचे, "बांगलादेशी घुसखोर देश खाल्ला जातायेत!" आता अमेरिकन म्हणतात, "भारतीय घुसखोर इकडचं इकडं रिकामं करतायेत!" पण काय करणार? आपले पंतप्रधान शांत!

            भारतीय लोक फक्त 'सॉफ्टवेअर' मध्ये नाहीत, 'हार्डवेअर' मध्येही बाप आहेत अमेरिकेत सॉफ्टवेअरपासून ते ढोल-ताश्यांपर्यंत भारतीय सर्वत्र आहेत. कॅलिफोर्नियाच्या कंपनीत भारतीय CEO, टेक्सासमध्ये पंजाबी ढाबा, आणि न्यूयॉर्कच्या टॅक्सीमध्ये सिक्सर उडवणारा बिहारी! पण ट्रम्पबाबांना वाटतं, हे सगळे अमेरिकेचं नुकसान करतायत! खरं म्हणजे हे भारतीयच अमेरिकेची कामं करतायत – कारण शेतीपासून आयटीपर्यंत सगळं भारतीयांच्या जोरावर चाललंय.

            भारतीय अमेरिकन लोकांना H1B व्हिसा द्यायला अमेरिका कमी करणार आणि त्यांच्या भारतीय सासरवासरांना एअरपोर्टवरून परत पाठवणार! एका बिचाऱ्या काकांना अमेरिकेत मुलाकडे राहायला जायचं होतं, पण अमेरिकन अधिकाऱ्यांनी विचारलं, "तुमच्या परतीच्या तिकिटाचं काय?" काकांनी म्हटलं, "सासूबाईंचा स्वयंपाक आवडला तर थांबतो, नाहीतर परत येतो!" पण अमेरिकन अधिकाऱ्यांनी तिकीट नसल्यामुळे त्यांना परत पाठवलं.

            मोदीजींनी बांगलादेशी घुसखोरांना देशाच्या समस्या ठरवलं होतं, आणि आता अमेरिकेने भारतीय घुसखोरांना आपल्या समस्येचं मूळ ठरवलंय. एके काळी आपल्या भाषणांनी ट्रम्पबाबांना भारून टाकणारे मोदीजी आता ह्या मुद्द्यावर चूप आहेत. कारण अमेरिकन "पितृसत्ता" कुठे बोलू देतेय?

            अमेरिकन लोक म्हणतात, "आम्हाला परदेशी नकोत!" आणि भारतीय अमेरिकेत जायला निघालेत! अमेरिका "मेक अमेरिका ग्रेट अगेन" म्हणत भारतीयांना बाहेर टाकतेय आणि भारत "अमृतकाल" म्हणत अमेरिकेत जायला वीजेच्या वेगाने अर्ज करतायत.
तर, आता तरी समजून घ्या, अमेरिकेच्या माकडहाती कोलीत देऊ नका, आणि भारतातल्या जॉब मार्केटला मजबूत करा, नाहीतर एक दिवस अमेरिकन लोक भारतात IT जॉबसाठी अर्ज करताना दिसतील!
- डॉ. रियाज़ देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त (सेनि), औरंगाबाद.