संविधानविरोधी धोरणांविरोधात भारत मुक्ती मोर्चा-राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचा बुलढाण्यात एल्गार!
बुलढाणा, २१ जुलै (मो. अहफाज़ कडून): केंद्रातील भाजप-आरएसएस सरकार संविधानविरोधी धोरणे राबवून देशाच्या लोकशाही व्यवस्थेला आणि संविधानिक मूल्यांना तडा देत असल्याचा गंभीर आरोप करीत भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी महामहीम राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
देशातील ३१ राज्यांतील ६२५ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हे आंदोलन पार पडल्याचा दावा आंदोलकांनी केला. बुलढाणा येथे हे आंदोलन भारत मुक्ती मोर्चाचे राज्य कार्याध्यक्ष भागवत जाधव यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.
आंदोलनादरम्यान भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार, धार्मिक स्वातंत्र्य आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला असताना केंद्र सरकार आरएसएसच्या विषमतावादी आणि संविधानविरोधी विचारसरणीवर चालत असल्याचा आरोप करण्यात आला. संविधानाच्या मूलभूत तत्त्वांवर आघात करणाऱ्या धोरणांविरोधात देशव्यापी जनआंदोलन उभारण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
निवेदनात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA), समान नागरी संहिता (UCC) आणि वक्फ (दुरुस्ती) अधिनियम-२०२५ हे संविधानविरोधी असल्याचा आरोप करीत ते तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसेच हजरत मुहम्मद (सल्लल्लाहु अलैही वसल्लम), छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पेरियार रामास्वामी आणि सत्यशोधक लहुजी वस्ताद साळवे यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या व्यक्ती व संघटनांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.
याशिवाय खोट्या गुन्ह्यांमध्ये अटक करून कारागृहात ठेवण्यात आलेल्या मुस्लिम आणि बहुजन समाजातील युवकांची तात्काळ सुटका करावी, धार्मिक स्थळांवरील पाडकामे आणि कथित अतिक्रमणे थांबवावीत, तसेच ओबीसींसह सर्व समाजांची जातनिहाय जनगणना करून तिचा अहवाल तातडीने जाहीर करावा, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात महामहीम राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर करताना सचिन इंगळे (जिल्हाध्यक्ष, भारत मुक्ती मोर्चा), ऐफाज गाझी (जिल्हा कार्याध्यक्ष, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा), आदिल शहा (तालुका अध्यक्ष, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा), हमीद शेख, बादशहा शंहशाहा, समीर शेख सलाम, शेख आलीमभाई यांच्यासह भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.