‘स्मार्ट सिटी’ की ‘माफिया सिटी’? खाम नदीत खुलेआम बेकायदेशीर प्लॉटिंग

‘स्मार्ट सिटी’ की ‘माफिया सिटी’? खाम नदीत खुलेआम बेकायदेशीर प्लॉटिंग

छत्रपती संभाजीनगर | १८ मार्च : शहरातील खाम नदी परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामांचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, यामध्ये भू-माफिया, महसूल विभाग, महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी प्रशासन यांच्यातील कथित संगनमतावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

        हिमायतनगर परिसरातील गट क्रमांक ३१ व ३९ तसेच आसपासच्या भागात खाम नदीच्या सरकारी जमिनीवर माती, वाळू व डबर टाकून मोठ्या प्रमाणावर भराव करण्यात आला आहे. या भरावावरच आता सर्रास प्लॉटिंग करून गोरगरीब नागरिकांना जमिनी विकल्या जात असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.

सरकारी जमिनीची खुलेआम विक्री!

       तक्रारीनुसार, नदीपात्रालगत ज्यांची थोडीफार खासगी जमीन होती, त्या काही लोकांनी चारपट क्षेत्र नदीच्या जमिनीत भराव टाकून वाढवले आणि त्याच जागेची विक्री सुरू केली. विशेष म्हणजे ही जमीन “No Development Zone” मध्ये येत असूनही, ती बोगस पद्धतीने विकली जात असल्याचा आरोप आहे.

महसूल विभाग झोपेत?

       या संपूर्ण प्रकरणात महसूल विभागाची भूमिका संशयास्पद ठरत आहे. ७/१२ उताऱ्यांमध्ये दाखवलेल्या क्षेत्रापेक्षा अधिक जमिनींची नोंदणी कशी झाली? बोगस व्यवहारांना मान्यता कशी मिळाली? असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकारी जमिनींचा असा उघडपणे गैरवापर होत असताना महसूल प्रशासनाने डोळेझाक केल्याचे चित्र स्पष्ट दिसते.

महानगरपालिकेचा ‘आशीर्वाद’ ?

        सर्वात धक्कादायक बाब म्हणजे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागावरच थेट आरोप करण्यात आले आहेत. काही अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संगनमतानेच हे बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याचा आरोप अर्जदाराने केला आहे.

       शहरात एकीकडे अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमा राबवल्या जात असताना, दुसरीकडे खाम नदीतच बांधकामे सुरू राहणे हे प्रशासनाच्या दुहेरी धोरणाचे उदाहरण मानले जात आहे.

स्मार्ट सिटी की ‘अनियंत्रित सिटी’?

      Aurangabad Smart City Development Corporation Ltd. अंतर्गत शहराचा विकास होत असल्याचे सांगितले जाते. मात्र खाम नदीसारख्या महत्त्वाच्या नैसर्गिक संपत्तीवरच अतिक्रमण होत असताना स्मार्ट सिटी प्रशासन नेमके काय करत आहे, हा सवाल नागरिक विचारत आहेत.

        नदी विकासासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात असताना, त्याच नदीपात्रावर बेकायदेशीर प्लॉटिंग सुरू असणे ही मोठी शोकांतिका ठरत आहे.

भविष्यातील मोठा धोका

        तज्ज्ञांच्या मते, नदीपात्रातील अशा बेकायदेशीर बांधकामांमुळे पूरस्थिती गंभीर होऊ शकते. भविष्यात मोठ्या प्रमाणावर जीवित व मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तक्रारदाराने प्रशासनाकडे खालील मागण्या केल्या आहेत:

• खाम नदीवरील सर्व अतिक्रमण तात्काळ हटवावे

• बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत

• संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही चौकशी करून कारवाई करावी

नागरिकांचा सवाल

       छत्रपती संभाजीनगरमध्ये एकीकडे अतिक्रमणविरोधी कारवाईचे ढोल वाजवले जातात, तर दुसरीकडे नदीच गिळंकृत होत असताना प्रशासन गप्प का? हा फक्त निष्काळजीपणा आहे की संगनमत?