भारत-पाक लढतीत दहा सेकंदासाठी 25 ते 30 लाखांचा दर

भारत-पाक लढतीत दहा सेकंदासाठी 25 ते 30 लाखांचा दर

नवी दिल्ली : टी-२० वर्ल्डकपच्या सुरुवातीलाच भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या रविवारी महामुकाबला रंगणार आहे. या लढतीकडे तमाम क्रिकेटशौकिनांच्या नजरा लागल्या आहेत. दोन पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील या सामन्याला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती लाभेल, या उद्देशानेच जाहिरात क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या सामन्यासाठी प्रति १० सेकंदांकरिता २५ ते ३० लाखांचा दर हा जाहिरातींसाठी असणार आहे. भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात आतापर्यंत प्रसारित झालेल्या कोणत्याही कार्यक्रमासाठी अथवा सामन्यासाठी इतका दर आकारण्यात आला नव्हता.

टी-२० वर्ल्डकप स्पर्धा ओमान आणि यूएई येथे १७ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून २९ दिवसांत ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी दुबई येथे होईल. आयपीएल-२०२१चा थरार अलीकडेच संपल्यानंतर आता टी-२० वर्ल्डकपचे प्रसारण करणार्‍या स्टार स्पोर्ट्‌स वाहिनीने आता या महत्त्वाच्या स्पर्धेकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे त्यांनी या स्पर्धेसाठी प्रत्येक १० सेकंदाकरिता ९.५ लाख रुपयांचा दर निश्चित केला आहे. स्टारने जाहिरातींकरिता स्टार स्पोर्ट्‌सशी ९०० कोटी रुपयांचा तर डिस्ने आणि हॉटस्टारशी २७५ कोटी रुपयांचा करार केला आहे. टी-२० वर्ल्डकपसाठी १६ प्रायोजकांशी करार करण्यात आले आहेत. त्यात बायजूस, ड्रीम ११, कोका-कोला, विमल, फोनपे, हॅवेल्स, नेटमेड्‌स, कॉइनडीसीएक्स, जिओमार्ट, स्कोडा, माँडेलेझ, रिलायन्स ट्रेण्ड्‌स, पेरनॉड, अपस्टॉक्स, सॅमसंग आणि क्रेड यांचा समावेश आहे. सहप्रायोजकांना प्रत्येक सामन्याला १५० सेकंदाचा अवधी मिळणार आहे. तसेच सहयोगी प्रायोजकांना प्रत्येक सामन्याकरिता ९० सेकंद मिळतील. डिस्ने आणि हॉटस्टारवर ड्रीम११, विमल इलायची, कॉइनस्विच कुबेर, ओप्पो, फोनपे, मारुती सुझुकी, एएमएफआय, स्विगी, माँडेलेझ आणि अपस्टॉक्स यांच्या जाहिराती दाखवण्यात येतील.

भारतात २०१६ साली झालेल्या टी-२० वर्ल्डकपदरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळाली होती. तब्बल ८३ दशलक्ष लोकांनी या सामन्याचा आस्वाद लुटला होता आणि स्टार नेटवर्क तसेच दूरदर्शनवर या सामन्याला १७.३ रेटिंग मिळाले होते. २००७साली झालेल्या टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यापेक्षा हा सामना सर्वाधिक पाहिला गेला होता. टी-२० वर्ल्डकपसाठी फक्त जाहिरातींकरताच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत नसून या स्पर्धेचे आयोजन करणार्‍या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेलाही (आयसीसी) पुरस्कर्त्यांचे भक्कम पाठबळ मिळाले आहे. आयसीसीने पुरस्कर्त्यांशी कोट्यवधी रुपयांचे करार केले आहेत. आयसीसीने गेल्या १२ महिन्यांत अनेक पुरस्कर्त्यांशी करार केले असून त्यात १५ पुरस्कर्त्यांचा समावेश आहे. ओप्पो, एमआरएफ टायर्स, बुकिंगडॉटकॉम, बायजूस, पोस्टपे, इमिरेट्‌स, मनीग्राम, बिरा, स्टार स्पोर्ट्‌स, कोका-कोला, अपस्टॉक्स, निस्सान, रॉयल स्टॅग, ड्रीम११ आणि जेकब्स ग्रीक या पुरस्कर्त्यांशी आयसीसीने करार केले आहेत.

तिकिटविक्रीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद

फक्त जाहिरातींच्या बाबतीतच नवनवे विक्रम नोंदवले जात नाहीत तर २४ ऑक्टोबर रोजी रंगणार्‍या या महामुकाबल्यासाठीची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. तिकिटांना सध्या जबरदस्त मागणी असून काळ्याबाजारात चढ्या भावाने तिकिटांची विक्री होत आहे. तिकीटांच्या दरापेक्षा पाच पटीने पैसे आकारून सध्या तिकिटे विकली जात आहेत. शुक्रवार आणि शनिवारी हा दर कैक पटीने वाढण्याची शक्यता आहे.