माजी लष्करप्रमुख नरवणे यांनी स्पष्ट केली पुस्तकामागची भूमिका
माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) मनोज मुकुंद नरवणे यांनी लिहिलेल्या “Four Stars of Destiny” या आत्मचरित्रावरून सुरू असलेला राजकीय वाद अखेर नव्या वळणावर पोहोचला आहे. अनेक आठवडे माध्यमांमध्ये चर्चा आणि संसदेत आरोप–प्रत्यारोप सुरू असताना जनरल नरवणे शांत होते. मात्र या आठवड्यात त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका छोट्या पण ठाम विधानामुळे संपूर्ण चर्चेचा सूर बदलला आहे.

या पुस्तकात त्यांच्या कार्यकाळातील महत्त्वाचे निर्णय, राजकीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चा आणि 2020 मध्ये भारत–चीन सीमारेषेवरील (LAC) तणावाच्या काळातील काही संवेदनशील घडामोडींचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. या उताऱ्यांचा आधार घेत विरोधी पक्षांनी सरकारच्या संरक्षण धोरणांवर आणि तयारीवर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे या पुस्तकाभोवती मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला होता.
या वाढत्या वादाला उत्तर देण्यासाठी जनरल नरवणे यांनी कोणतीही पत्रकार परिषद न घेता सोशल मीडियाचा मार्ग निवडला. त्यांच्या संक्षिप्त निवेदनात त्यांनी स्पष्ट केले की हे पुस्तक कोणत्याही राजकीय हेतूने लिहिलेले नसून त्यांच्या लष्करी सेवाकाळातील अनुभव आणि आव्हानांची अचूक व व्यावसायिक नोंद म्हणून लिहिले आहे. त्यांनी प्रामाणिकपणा आणि तथ्यांची अचूकता यावर भर देत सांगितले की हा इतिहास भविष्यातील लष्करी अधिकाऱ्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी उपयुक्त ठावा म्हणून नोंदवला गेला आहे.
त्यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे राजकीय आरोपांच्या चर्चेला काही प्रमाणात विराम मिळाल्याचे मानले जात आहे. लष्करी तज्ज्ञांनीही त्यांच्या या पावलाचे स्वागत केले असून, त्यांनी माजी लष्करी नेतृत्वाकडून अपेक्षित असलेली पक्षनिरपेक्ष भूमिका कायम ठेवली असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे आता या पुस्तकातील धोरणात्मक आणि लष्करी दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष केंद्रित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.