कोट्यावधी रुपये किमतीच्या वक्फ मालमत्तेचा गौडबंगाल : तिघांविरुद्ध कायदेशीर कारवाईला सुरुवात

कोट्यावधी रुपये किमतीच्या वक्फ मालमत्तेचा गौडबंगाल : तिघांविरुद्ध कायदेशीर कारवाईला सुरुवात

औरंगाबाद : सिटी चौकातील दरगाह शाह बेरिया हे वक़्फ महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे रास्त (Direct) नियंत्रणाखाली  आहे.  दिनांक 17/05/1973 चे गॅझेट चे Part-C मधील अनुक्रमांक 23 मध्ये पान नं. 14 आणि 15 वर या वक्फ शी संबंधित मालमत्ता नमूद आहे. या वक्फ मालमत्तेतील चार मजली मिळकत (CTS No. 6015) महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सय्यद एजाज हुसेन यांनी त्यांचे कार्यालयीन आदेश क्रमांक मरावमं/एसएनटी-691/6625/2014 दिनांक  25/11/2014 अन्वये श्री विक्रम प्रेमचंद सुराणा यांना दरमहा 12750/- रुपये भाड्याने अकरा महिन्यासाठी भाडेपट्ट्यावर देण्याचे आदेश पारित केले होते.

          भाडे पट्ट्याचे उपरोक्त आदेशातील अटींप्रमाणे श्री विक्रम प्रेमचंद सुराणा यांनी दिनांक 10/12/2014 रोजी 100/- रुपयाचे बॉण्ड पेपरवर 11 महिन्यासाठी चे भाडेकरार केले होते. भाडेकराराची मुदत संपल्यानंतर या वक़्फ मिळकतीचे भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. तसेच भाडेकरार पण करण्यात आलेले नाही.

          श्री विक्रम प्रेमचंद सुराणा यांचे निधन झाले असून याबाबतची माहिती त्यांचे मुलांनी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळास कळविली नाही. तसेच कोट्यावधी रुपये किमतीची ही मालमत्ता वक्फ मंडळास परत न करता मंडळाचा विश्वास घात करून स्वतः चे फायद्यासाठी लबाडीने शेजारचे दुकानदार 'ऑनेस्टी' ड्रेसेस आणि 'ज़ैनी' ड्रेसेसचे मालक अब्दुल अज़ीज़ आणि अब्दुल रज़्ज़ाक यांना हस्तांतरित केली.



          वक्फ मालमत्ता भाडेपट्टा नियम 2014 नुसार लीज़डीड संपल्यानंतर वक्फ मालमत्ता जशी आहे तशीच वक्फ मंडळाकडे परत करणे बंधनकारक आहे. मालमत्ता परत न करता त्यावर कब्जा चालू ठेवणे हे कायद्यानुसार 'अतिक्रमण'  समजले जाते आणि अशा प्रकारे मालमत्ता स्वतःचे फायद्यासाठी लबाडीने विश्वास घात करून दुसऱ्या इसमास देणे हे कलम 420 409 406 447 भारतीय दंड विधान अन्वये दखलपात्र गुन्हा ठरतेे . तसेच ज्या इसमाने अशी मालमत्ता हस्तांतरित करून घेतली तो पण याच कलमानुसार अतिक्रमणकर्ता म्हणून गुन्हेगार ठरतो.

           या प्रकरणात महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे संबंधित अधिकाऱ्यांना या गोष्टी माहित असताना सुद्धा त्यांनी मागील सहा वर्षापासून या अतिक्रमणकर्त्यांचे विरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही. तसेच महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचा विश्वास घात करून मालमत्ता लबाडीने हस्तांतरण झाल्याचे समजल्यानंतर ही महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे 'ऑनेस्ट' आणि 'अर्थतज्ञ' अधिकाऱ्यांनी या गुन्हेगारांचे विरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. साधी नोटीस सुद्धा दिली नाही. वक्फ मंडळाच्या वेळोवेळी होणाऱ्या मीटिंगांमध्ये सुद्धा ह्या बाबी वर कोणतीही चर्चा घडवून आणली नाही.

         शाह बेरिया दरगाहशी संबंधित वक्फ अधिकाऱ्यांचा हा गौडबंगाल औरंगाबाद शहरातील एक समाज सेवक अझहर खान यांनी उघडकीस आणून बुधवार दिनांक 20 ऑक्टोबर 2021 पासून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने ती अतिक्रमित वक्फ मालमत्ता तात्काळ परत घ्यावी आणि संबंधित गुन्हेगारांचे विरुद्ध कलम 420 409 406 109 भारतीय दंड विधान अन्वये गुन्हा दाखल करावा, तसेच वक्फ मालमत्ता भाडेपट्टा नियम 2014 नुसार बाजार भावापेक्षा जास्त भाव देणाऱ्या इसमाला ती मालमत्ता भाडे पट्ट्यावर द्यावी म्हणून मागणी केली होती.

            अज़हर खान यांनी 20 ऑक्टोबरला उपोषण सुरू केल्यानंतर महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ खडबडून जागा झाला. 20 ऑक्टोबरलाच जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांनी या वक्फ मालमत्तेचे प्रत्यक्ष निरीक्षण करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल सादर केला.

          आज पासून दिवंगत विक्रम सुराणा यांचे वारसांचे विरुद्ध आणि अतिक्रमण करून या मालमत्तेचा गोडावून म्हणून उपयोग करणारे ऑनेस्टी आणि जैनी ड्रेसेसचे मालक अब्दुल अजीज आणि अब्दुल रज्जाक यांचे विरुद्ध  कायदेशीर कारवाई सुरू केल्याचे वक्फ अधिकाऱ्यांनी अझहर खान यांना लेखी कळविल्याने अझहर खान यांचे समाधान झाले. जिल्हा वक्‍फ अधिकारी श्री फैज़ आणि जनसंपर्क अधिकारी श्री अशफाक यांनी आपल्या हाताने त्यांना कोल्ड्रिंक पाजून त्यांचे उपोषण सोडवले. अझहर खान यांनी त्यांचे  समर्थन करणारे सर्व लोकांचे, संघटनांचे आणि राजकीय पक्षांचे तसेच सोशल मीडियाचे पत्रकारांचे आभार मानले.