देशातील लोकशाहीसमोरील सर्वात मोठा धोका : राजकीय पक्ष संपवण्याची योजना?
भारतातली लोकशाही आज नावापुरती उरली आहे, आणि तिच्या छातीत खंजीर खुपसायची योजना कोण करीत आहे हे ओळखणं आता अनिवार्य झालं आहे. हा देश जिवंत आहे कारण इथे लाखो लोकांना आपलं मत मांडण्याचा, सरकारला प्रश्न विचारण्याचा, आणि सत्ता बदलण्याचा अधिकार आहे. हा अधिकार कोण देतो? संसद? कोर्ट? की शक्तिशाली संघटना? नाही. हा अधिकार जिवंत ठेवतात – राजकीय पक्ष. त्या पक्षांची मुळावरच कुऱ्हाड चालवून लोकांना सत्ता व्यवस्थेपासून कायमचं बाहेर फेकण्याचा षड्यंत्रकारी खेळ सुरू आहे, आणि आपण गप्प बसलो आहोत.
२०१४ मध्ये देशभरात झालेल्या अण्णा हजारे आंदोलनाच्या वेळी एक धक्कादायक विचार लोकांच्या कानावर टाकण्यात आला – राजकीय पक्ष संविधानिक संस्था नाहीत. म्हणजे ते बेकायदेशीर आहेत. आणि ते विसर्जित केले पाहिजेत. हा विचार अण्णा हजारे स्वतःचा होता का? की ते फक्त एका ठरवून बसवलेल्या लाऊडस्पीकरमधून प्रसारित केलेलें ध्वनीतरंग होते? या विचाराची पाळेमुळे कुठे आहेत हे ओळखण्यासाठी शहाणपणा लागतो, आणि शहाणे लोक स्पष्टपणे सांगतात – या सिद्धांतामागे RSS ची छाया पसरलेली आहे.
हा खेळ केवळ विचारांचा नाही, तर भारतीय लोकशाहीच्या आत्म्यावर केलेला कुटील वार आहे. कारण जनतेला राजकीय व्यवस्थेत सहभागी होण्यासाठी एकच दार आहे – राजकीय पक्ष. तेच दार बंद केलं, तर जनता कायमची बाहेर. सत्ता थोड्या हातात, आणि उरलेले सर्व हतबल प्रेक्षक. लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाहीची राजवट उभी करायची असेल, तर सर्वात आधी राजकीय पक्ष नष्ट करायचे – हीच रणनीती दिसते. आणि ती आज देशात काटेकोरपणे अंमलात येताना दिसते.
लोकांच्या मनात राजकारणाबद्दल तिरस्कार निर्माण करा. प्रत्येक पक्षाला भ्रष्ट ठरवा. प्रत्येक नेत्याला चोर म्हणून रंगवा. जनतेला आशा, विश्वास आणि सहभागापासून तोडून टाका. आणि मग एक दिवस जाहीर करा – पक्षांची गरजच नाही. लोकांना हे पटेल, कारण त्यांच्या मनात आधीच वर्षानुवर्षे विष ओतलं गेलेलं आहे. लोकांचा विश्वास हीच लोकशाहीची ताकद आहे, आणि आज त्या विश्वासावरच छिन्नी चालवली जाते आहे.
या देशातील लोकशाही वाचवायची असेल, तर सर्वात आधी गाढ झोपेत गेलेली जनता जागी झाली पाहिजे. कारण हा लढा आता निवडणुकांचा, मतांचा किंवा कोण मुख्यमंत्री होतो याचा उरलेला नाही. हा लढा आहे – आपण अजूनही नागरिक आहोत की केवळ प्रजाच झालो आहोत याचा. स्वातंत्र्याच्या लढ्यात आपल्या पूर्वजांनी ज्या रक्ताने इतिहास लिहिला, त्याच रक्ताची किंमत आज आपण विसरलो आहोत.
राजकीय पक्ष वाचवणे म्हणजे केवळ संस्था वाचवणे नव्हे. ते म्हणजे स्वतःचा आवाज वाचवणे. स्वतःचा हक्क वाचवणे. सत्ता आपल्या हातात राहिली पाहिजे यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवणे. संघटित होणे, संघटित विचार करणे, आणि संघटित प्रतिकार करणे – हेच आजचं वास्तव उत्तर आहे.
आज प्रश्न एकच आहे – लोकांनी आपली लोकशाही स्वतःच्या हातात धरून तिचं रक्षण करणार की शंभर वर्षांनी इतिहासाच्या पानांवर लिहिलं जाईल – भारत एकेकाळी लोकशाही देश होता.
- डॉ. रियाज़ देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त (नि), संभाजीनगर (औरंगाबाद). 888836498