कॅमेरा सुरू होताच हलले पारध पोलीस! मुस्लिम महिलेची तक्रार घेतली; पण २० दिवसांतही FIR नाही

कॅमेरा सुरू होताच हलले पारध पोलीस! मुस्लिम महिलेची तक्रार घेतली; पण २० दिवसांतही FIR नाही

भोकरदन, २५ मे: (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचे समर्थक असल्याचा आरोप असलेल्या समाजकंटकांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने जालना जिल्ह्यातील पराध पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घर जाळणे, दरोडा, महिलेला मारहाण, विनयभंग, जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या आणि लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे गंभीर आरोप असतानाही पोलिसांनी वीस दिवस लोटले तरी अध्याप गुन्हा दाखल न केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

     जालना जिल्ह्यातील वळसावंगी येथील फिर्यादी मुस्लिम महिलेनी  दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, ६ मे २०२६ रोजी रात्री गावातील समाजकंटक प्रल्हाद बोडखे, शुभम बोडखे, सविता बोडखे, मनीष बोडके सह इतर २० ते २५ हिंदू धर्मीय समाजकंटक आरोपींनी त्यांच्या घरात घुसून  तिला आणि घरातील लोकांना मारहाण केली, घरातील सामानाची तोडफोड केली, घरातील २,५०,०००/- (अडीच लाख) रुपये रोख आणि अकरा तोळे सोना, गॅस सिलेंडर, टीव्ही इत्यादी समान लुटून नेले, तिला आणि तिच्या मुलांना घरात कोंडले,  पेट्रोल टाकून घर जाळण्यात आले. या घटनेत अंदाजे ४५ ते ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.

     मात्र एवढ्या गंभीर स्वरूपाच्या आरोपांनंतरही पराध पोलिसांनी ना  FIR नोंदवली, ना पीडित महिलेची तक्रार स्वीकारण्याची तयारी दाखवली, असा आरोप करण्यात येत आहे. पीडित महिला ९ मेपासून वारंवार पारध पोलीस स्टेशन आणि जालना पोलीस अधीक्षकाकडे दाद मागत फिरत होती. परंतु तिचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी तिला हेलपाटे मारायला लावण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

      विशेष म्हणजे, अखेर एका पत्रकार आणि वकिलासोबत पीडित महिला काल रात्री पारध पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर आणि पत्रकाराने कॅमेरा सुरू केल्यानंतरच पोलिसांनी तिची लेखी तक्रार स्वीकारली तरी पण गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे “पराध पोलिसांना कायद्यापेक्षा कॅमेऱ्याचीच भीती जास्त आहे का?” असा सवाल आता उपस्थित होत आहे.

      या प्रकरणाला धार्मिक आणि जातीय रंग देण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने आपल्या तक्रारीत केला आहे. “पीडित महिला मुस्लीम असल्यामुळे आणि समाजकंटक आरोपी हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्याची, आणि जालना जिल्ह्यातील मोठ्या राजकीय धेंड्याचे समर्थक असल्याची चर्चा असल्यामुळे पोलीस कारवाई करण्यास घाबरत आहेत का?” असा प्रश्न जनमानसातून उपस्थित केला जात आहे.

      कायद्याचे राज्य असलेल्या देशात गुन्ह्याचा तपास न्यायालय आणि पोलीस यंत्रणेने करायचा असतो. परंतु जमावाने घरात घुसून कथितरित्या कायदा हातात घेतला, घर जाळले आणि महिलेला विनयभंग करीत जीवाने मारण्याच्या आणि बलात्काराच्या त्या दिल्या, घरातील पैसे आणि दागिने आणि साहित्य लुटून नेले, असे गंभीर आरोप असताना देखील गुन्हा नोंदवण्यात विलंब होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.

       हा फक्त एका कुटुंबावरचा हल्ला नसून कायदा-सुव्यवस्थेवरचा थेट आघात आहे. पण FIRच दाखल करायची नाही, तक्रारच स्वीकारायची नाही, हा कोणता न्याय?

      पराध पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी, आणि विशेष करून पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई आणि विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजी नगर यांनी या प्रकरणात तत्काळ निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.