"नगरसेवक नाही, मग रुबाब कशाचा?" आयुक्तांचा दणका; नातेवाईकांच्या हस्तक्षेपावर चाप
छत्रपती संभाजीनगर, ८ जुलै: महानगरपालिकेच्या कामकाजात नगरसेवकांच्या नातेवाईकांचा वाढता हस्तक्षेप अखेर प्रशासनाच्या डोळ्यात खुपला असून आयुक्त अमोल येडगे यांनी याबाबत कडक कार्यालयीन परिपत्रक जारी करत संबंधितांची खरडपट्टी काढली आहे.
परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, निवडून आलेल्या नगरसेवक किंवा नगरसेविकांनाच महानगरपालिकेच्या कामकाजात सहभागी होण्याचा कायदेशीर अधिकार आहे. त्यांचे पती, पत्नी, भाऊ, मुले किंवा इतर नातेवाईकांना कोणताही अधिकृत अधिकार नसताना ते कार्यालयात वावरत आहेत, अधिकाऱ्यांवर दबाव टाकत आहेत, विकासकामांत हस्तक्षेप करत आहेत आणि स्वतःला नगरसेवक असल्याप्रमाणे वागत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

विशेष म्हणजे काही जण सोशल मीडियावर स्वतःला नगरसेवक म्हणून प्रसिद्धी देतात, अधिकारी-कर्मचाऱ्यांना फोन करून आदेश देण्याचा प्रयत्न करतात, तर काही जण कार्यालयांमध्ये थेट नगरसेवकांच्या अधिकारात वावरत असल्याचेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
आयुक्तांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, नगरसेवकांच्या नातेवाईकांचे कोणतेही आदेश पाळू नयेत, त्यांच्या दबावाला बळी पडू नये आणि नियमबाह्य कामे करू नयेत. अशा प्रकारचे कृत्य महानगरपालिकेची बदनामी करणारे असून कारवाईस पात्र असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या परिपत्रकामुळे आतापर्यंत "बिनपगारी नगरसेवक" म्हणून मिरवणाऱ्या आणि अधिकाऱ्यांवर रुबाब दाखवणाऱ्या नातेवाईकांना मोठा दणका बसल्याची चर्चा महानगरपालिका वर्तुळात सुरू झाली आहे. प्रशासनाने आता स्पष्ट संदेश दिला आहे की लोकशाहीत अधिकार हा निवडून आलेल्या प्रतिनिधीचाच असतो; नातेसंबंधांच्या जोरावर सत्ता गाजविणाऱ्यांना यापुढे थारा मिळणार नाही.