नाव लपवायचं, धर्म दाखवायचा? पुणे बलात्कार खून प्रकरणात मीडियाचा दुहेरी चेहरा उघड

नाव लपवायचं, धर्म दाखवायचा? पुणे बलात्कार खून प्रकरणात मीडियाचा दुहेरी चेहरा उघड

     पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना केवळ गुन्हा नाही, तर माणुसकीच्या छातीत खुपसलेला खंजीर आहे. संपूर्ण महाराष्ट्र संतापला, लोक रस्त्यावर उतरले, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी झाली. पण या संतापाच्या वातावरणात एक वेगळाच प्रश्न जनतेच्या मनात घोंघावत राहिला—आरोपीचे नाव कुठे आहे?

      देशातील अनेक वृत्तवाहिन्या, पोर्टल्स, वृत्तपत्रे आणि डिजिटल माध्यमांनी ही बातमी मोठ्या प्रमाणावर चालवली. मथळे काय होते?“६५ वर्षीय नराधम”, “वृद्धाने चिमुरडीवर अत्याचार केला”, “चार वर्षांच्या मुलीचा खून”... पण नाव नाही. ओळख नाही. पार्श्वभूमी नाही. जणू काही आरोपी माणूस नसून एखादी सावली होती.

     जनतेने शोध घेतला. गुगलवर शोधले. मराठी, हिंदी, इंग्रजी अशा सर्व माध्यमांवर बातम्या तपासल्या. पण आरोपीचे नाव कुठेच सापडले नाही. अनेकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांनाही विचारले, पण ठोस उत्तर मिळाले नाही. शेवटी सोशल मीडियावरील चर्चांमधून आणि स्थानिक पातळीवरील माहितीमधून आरोपीचे नाव भीमा कांबळे असल्याचा उल्लेख समोर आला.

      मग प्रश्न निर्माण होतो—हे नाव मुख्य प्रवाहातील माध्यमांना माहीत नव्हते का? की माहीत असूनही जाणीवपूर्वक लपवले गेले?

आरोपी मुस्लीम असता तर? 

       हा प्रश्न विचारायलाच हवा. कारण देशातील मागील काही घटनांमध्ये आपण पाहिले आहे—जर आरोपी मुस्लीम असेल, तर माध्यमांच्या मथळ्यात पहिल्याच ओळीत नाव असते. काही वेळा धर्माचा ठळक उल्लेख असतो. “फलाणा खान”, “तमुक शेख”, “अमुक पठाण” अशी नावे मथळ्यातून झळकतात. बातमीपेक्षा नाव मोठं असतं. गुन्ह्यापेक्षा धर्मावर भर असतो.

     पण आरोपी इतर धर्मीय असेल, तर अचानक माध्यमांना संयम आठवतो. नैतिकता आठवते. कायद्याची भाषा आठवते. मग “६५ वर्षीय आरोपी”, “एक व्यक्ती”, “स्थानिक इसम”, “गावातील वृद्ध” असे शब्द पुढे येतात.

     हा फरक योगायोग नाही. हा निवडक दृष्टिकोन आहे. हा पूर्वग्रहाचा व्यवसाय आहे. हा पत्रकारितेच्या नावाखाली चालणारा विचारधारात्मक व्यापार आहे.

गुन्हेगाराचा धर्म नसतो — पण माध्यमांना असतो?
       गुन्हेगाराची एकच ओळख असते—तो गुन्हेगार आहे. बलात्कारी हा बलात्कारीच असतो. तो कोणत्या धर्माचा आहे यावर त्याचा गुन्हा कमी-जास्त होत नाही. हत्या करणारा, बालिकेवर अत्याचार करणारा, समाजाच्या विवेकाला काळिमा फासणारा कोणत्याही धर्माचा असो—तो नराधमच असतो.

     पण दुर्दैव असे की काही माध्यमांना गुन्हेगाराचा धर्म महत्त्वाचा वाटतो. कारण त्यातून TRP मिळतो. समाजात द्वेष पसरवता येतो. निवडक समुदायाला दोषी ठरवता येते. लोकांच्या भावनांशी खेळता येते.
जेव्हा आरोपी मुस्लीम असतो, तेव्हा संपूर्ण समाजावर प्रश्नचिन्ह उभे केले जाते.जेव्हा आरोपी हिंदू, दलित, मराठा, ब्राह्मण किंवा इतर कुणी असतो, तेव्हा “व्यक्तिगत गुन्हा” म्हणून गोष्ट संपवली जाते.
ही पत्रकारिता नाही. हा दुहेरी मापदंडांचा बाजार आहे.

पुणे प्रकरणाने दाखवलेला आरसा
      नसरापूर प्रकरणात जर आरोपीचे नाव भीमा कांबळे असेल, तर ते नाव जाहीर करण्यास माध्यमांना नेमकी कोणती अडचण होती?पीडितेची ओळख लपवणे कायदेशीर आणि नैतिक कर्तव्य आहे. पण आरोपीची ओळख, विशेषतः अटकेनंतर, अनेकदा सार्वजनिक नोंदींचा भाग असते. मग येथे मौन का?
      कारण नाव समोर आले असते, तर काहींचा तयार आखलेला “नॅरेटिव्ह” मोडला असता. समाजाला कळले असते की गुन्हा हा कोणत्याही एका धर्माचा मक्तेदारी विषय नाही. विकृतीला जात-धर्म नसतो. आणि ते सत्य काहींना अस्वस्थ करते.

माध्यमांनी आत्मपरीक्षण करावे
     लोकशाहीत माध्यमांना चौथा स्तंभ म्हणतात. पण स्तंभ जर वाकडा झाला, तर संपूर्ण इमारत धोक्यात येते. पत्रकारितेचे काम आहे सत्य मांडणे, सत्ता आणि समाज दोघांनाही प्रश्न विचारणे, आणि न्यायाच्या बाजूने उभे राहणे.

      जर एका प्रकरणात आरोपीचे नाव द्यायचे असेल, तर सर्व प्रकरणांत द्या.जर नाव द्यायचे नसेल, तर कुणाच्याही बाबतीत देऊ नका.नियम एक असावा—धर्मानुसार बदलणारा नाही.

जनतेनेही सजग राहिले पाहिजे
      आज सोशल मीडिया, डिजिटल माध्यमे आणि नागरिक पत्रकारिता यांच्या युगात माहिती लपवणे अवघड झाले आहे. लोक प्रश्न विचारतात. तुलना करतात. ढोंग ओळखतात. त्यामुळे माध्यमांनी हे समजून घेतले पाहिजे की जनता आता आंधळी नाही.
      निवडक बातम्या, निवडक संताप, निवडक नैतिकता आणि निवडक धर्मनिरपेक्षता यांचा काळ संपत चालला आहे.
       त्या निष्पाप चिमुरडीला न्याय मिळायलाच हवा. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. पण त्याचबरोबर माध्यमांनाही समाज उत्तर मागतो आहे—

      आरोपी मुस्लीम असेल तर नाव पहिल्या ओळीत, आणि इतर धर्मीय असेल तर नाव गायब — हा नेमका कोणता पत्रकारितेचा धर्म आहे?

- डॉ रियाज़ देशमुख, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस (रि), संभाजीनगर (औरंगाबाद)