बुलढाणा ग्रामीण हद्दीत घरफोड्यांचा सुळसुळाट; नांद्राकोळीत वकिलाच्या घरातून रोख व दागिने लंपास

बुलढाणा ग्रामीण हद्दीत घरफोड्यांचा सुळसुळाट; नांद्राकोळीत वकिलाच्या घरातून रोख व दागिने लंपास

बुलढाणा, २५ मे : बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, पोलिसांच्या गस्त व प्रतिबंधात्मक कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नांद्राकोळी गावात अज्ञात चोरट्यांनी एका वकिलाच्या घराला लक्ष्य करत रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा तब्बल ९२ हजार १०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

     मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार सोमेश गजानन गवळी (वय २७, व्यवसाय – वकील, रा. नांद्राकोळी) यांनी बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २० मे २०२६ रोजी रात्री त्यांच्या बहिणीची प्रकृती अचानक बिघडल्याने ते व त्यांचे वडील उपचारासाठी बुलढाणा येथील खासगी रुग्णालयात गेले होते. घराला कुलूप लावून कुटुंबीय शेजारी झोपण्यासाठी गेले होते. घराची चावी शेजारच्या घराच्या खिडकीत ठेवण्यात आली होती.

     दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी संधी साधून घरात प्रवेश केला व कपाटातील रोकड आणि दागिन्यांवर हात साफ केला. २२ मे रोजी सकाळी कपाट तपासले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला.

     चोरीस गेलेल्या मालामध्ये ३० हजार रुपये रोख रक्कम, अंदाजे १.७५ ग्रॅम सोन्याचे कानातील लटकन, १ ग्रॅम सोन्याची नथ, १४ ग्रॅम वजनाच्या दोन चांदीच्या अंगठ्या तसेच ४ ग्रॅम सोन्याची अंगठी असा एकूण ९२ हजार १०० रुपयांचा ऐवज समाविष्ट आहे.

     याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०५ व ३३१(४) नुसार गुन्हा क्रमांक ०१८३/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गजानन सदाशिव काकडे करीत आहेत.

     दरम्यान, बुलढाणा ग्रामीण परिसरात घरफोडी, चोरी आणि रात्रीच्या गुन्ह्यांचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. अनेक गावांमध्ये रात्री पोलिस गस्त अपुरी असल्याची तक्रार वारंवार होत असून, चोरट्यांमध्ये पोलिसांचा धाक उरला नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. स्थानिक नागरिकांनी रात्रीची गस्त वाढवून संशयितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.