शिवाजी महाराज आणि मुसलमान – जातीय द्वेषाला चिरडणारा ऐतिहासिक दस्तऐवज
महाराष्ट्र आणि मुंबईतील उर्दू पत्रकारितेचे एक आदरणीय नाव म्हणजे श्री. सईद हमीद. ते फक्त ज्येष्ठ पत्रकारच नाहीत तर उर्दू-हिंदी रंगभूमीवरील एक प्रख्यात नाटककार म्हणूनही परिचित आहेत. तसेच छत्रपती शाहू महाराज मुस्लिम फ्रंट, मुंबईचे अध्यक्ष आहेत. मर्डर ऑफ गांधी, दरवाजे खोल दो, सदा-ए-बाज़गश्त यांसारख्या प्रभावी उर्दू नाटकांमधून त्यांनी सांप्रदायिकतेच्या विरोधात नेहमीच आवाज उठवला आहे. तर त्यांच्या हिंदीतील स्वामी विवेकानंद या पूर्णांकी नाटकाला संपूर्ण भारतात मोठी लोकप्रियता मिळाली.
पत्रकारिता आणि नाट्यलेखन या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी तब्बल ४५ वर्षे सक्रिय काम केले असून राष्ट्रीय सहारा, इन्क्लाब, उर्दू टाईम्स, सहाफत यांसारख्या अनेक नामांकित उर्दू दैनिकांत त्यांनी जबाबदारीच्या पदांवर काम पाहिले. आजही ते दैनिक उर्दू न्यूजमध्ये नियमित स्तंभलेखन करत असतात. मराठी विचारधारा – फुले, शाहू, आंबेडकर – यांचा प्रभाव त्यांच्या लिखाणात स्पष्ट दिसून येतो.
सन २०१८ मध्ये त्यांच्या लेखणीमधून एक महत्त्वाचे पुस्तक उर्दू भाषेत प्रकाशित झाले –
“छत्रपती शिवाजी महाराज और मुसलमान”.
यानंतर त्याचे हिंदी आवृत्ती २०२० मध्ये प्रसिद्ध झाले.
या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे मुसलमानांशी असलेले निकटचे संबंध यांचा उलगडा केला आहे. इतिहासाचे विकृत चित्र रंगवून काही जातीयवादी संघटनांनी शिवाजी महाराजांना मुस्लिमविरोधी ठरविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर हिंदू आणि मुस्लिम समाजात पसरलेले अनेक गैरसमज बऱ्याच प्रमाणात कमी झालेले आहेत, हे आपण आजच्या सामाजिक वातावरणातून अनुभवतो.
सईद हमीद यांनी आपल्या प्रस्तावनेत ७० च्या दशकातील मुंबई, ठाणे, भिवंडी भागातील शिवजयंतीदरम्यान निर्माण होणाऱ्या तणावाचा उल्लेख केला आहे. त्या काळी पसरविलेल्या खोट्या इतिहासामुळे हिंदू-मुस्लिम दंगली उसळत असत. पण नंतर सत्याधारित ऐतिहासिक संशोधनामुळे हे चित्र बदलले. आज अनेक ठिकाणी हिंदू-मुसलमान मिळून शिवजयंती साजरी करतात, हा बदल लक्षवेधी आहे.
या ग्रंथातून त्यांनी स्पष्ट केले आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि बहुजनवादी शासक होते. त्यांची प्रतिमा संकुचित करून एका पंथाच्या चौकटीत बसविण्याचा प्रयत्न करणे म्हणजे इतिहासाशी अन्याय होय.
नुकतंच श्री सईद हमीद यांनी छत्रपती संभाजीनगर चे दौऱ्यावर असताना या पुस्तकाची हिंदी आवृत्तीची एक प्रत जनसत्ताचे संपादकांना भेट केली. या ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर त्यातील काही निवडक भाग मराठी वाचकांसाठी क्रमवार वेबसाईटवर प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे, पुढील अंकापासून या ग्रंथातील काही महत्त्वाचे भाग मराठीत वाचकांसमोर ठेवले जाणार आहेत. यातून छत्रपती शिवाजी महाराज आणि मुसलमान यांच्यातील ऐतिहासिक संबंधांचा खरा आरसा तुमच्यासमोर येईल.
ही लेखमालिका समाजात पसरविलेल्या खोट्या समजुतींना दूर करून सत्य, सलोखा आणि ऐक्याचा संदेश देईल, अशी आम्हाला खात्री आहे.
✍️ डॉ. रियाज़ देशमुख, संपादक.