चार मुलांचा सल्ला, रिकाम्या पोटांचा देश आणि सोशल मीडियावर नवनीत राणांची धुलाई

चार मुलांचा सल्ला, रिकाम्या पोटांचा देश आणि सोशल मीडियावर नवनीत राणांची धुलाई

देशात महागाई वाढतेय, बेरोजगारी डोकं वर काढतेय, सरकारी शाळा बंद पडतायत, रुग्णालयात खाटा नाहीत…
आणि याच देशात एका माजी खासदारांना अचानक लोकसंख्या वाढीची चिंता सतावते—तीही फक्त एका धर्मासाठी!

“हिंदूंनी किमान चार मुले जन्माला घालावीत,” असं आवाहन करताच सोशल मीडियावर जणू उत्सवच सुरू झाला. मात्र हा उत्सव समर्थनाचा नव्हे, तर उपहासाचा, टोमण्यांचा आणि आरसा दाखवणाऱ्या कमेंट्सचा होता.

नेटकऱ्यांनी थेट पहिला प्रश्न विचारला —
“सुरुवात स्वतःपासून करा मॅडम.”

कोणीतरी लिहिलं,
“चार नव्हे, 40 मुलं घाला… एक आदर्श तयार करा. पण तुमचा मेंदू त्यांना देऊ नका.”

तर दुसऱ्याने थेट सामाजिक जबाबदारी आठवण करून दिली —
“आम्ही दोन मुलांची जबाबदारी घेऊ शकतो, पण उरलेल्या दोन मुलांची जबाबदारी सरकार घेणार आहे का?”

काही जणांनी राजकीय वास्तवावर बोट ठेवलं —
“सरकारी शाळा बंद करायला फंड नाही, पण मेस्सी आणायला 175 कोटी आहेत… आणि तुम्ही चार मुलांचा सल्ला देता?”

काही कमेंट्स तर इतक्या जहरी होत्या की त्या वाचून प्रश्न पडतो — जनता खरंच भोळी आहे की नेतेच तिला गृहित धरतात?

“तुम्ही किती काढलेत?”
“Fallopian tube unlock करा, होऊन जाऊद्या.”
“आधी तुमचे चार दाखवा, मग तोंड उघडा.”

काहींनी थेट कायदा करण्याचं आव्हान दिलं —
“धाडस असेल तर कायदा करा — निवडणूक लढवायला किमान 10 मुलं बंधनकारक!”

तर काहींनी सामाजिक वास्तव मांडलं —
“आज एक मूल वाढवणं कठीण आहे. शिक्षण, आरोग्य, अन्न… काहीच स्वस्त नाही.”

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अनेकांनी या विधानामागील राजकीय हेतू ओळखला —
“निवडणूक जवळ आली की, लोकांचे प्रश्न बाजूला सारून धर्म, लोकसंख्या, भावना उकरून काढायच्या.”

एक कमेंट तर फारच बोलकी होती —
“मुलांना शिक्षण द्या, शहाणे व्हा, माणुसकी ठेवा… पण हे सांगणार नाहीत.”

या सगळ्या प्रतिक्रियांमधून एक गोष्ट स्पष्ट झाली —
आजची जनता फक्त घोषणा ऐकत नाही, ती उलट प्रश्न विचारते.
ती उपहासाने का होईना, पण वास्तव दाखवते.

शेवटी प्रश्न असा आहे —
देशाला खरंच चार मुलांची गरज आहे की चार शहाण्या निर्णयांची?
लोकसंख्या वाढवायची की लोकांचे आयुष्य सुसह्य करायचं?

कारण
पोट भरण्याची व्यवस्था नसताना, गर्भ भरण्याचा सल्ला देणं म्हणजे जबाबदारी नव्हे—निर्लज्जपणा आहे.