MIM च्या प्रचार रॅलीदरम्यान गोंधळ; कलीम कुरेशीसह ४० ते ५० जणांविरोधात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर | दि ७, जानेवारी (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर शहरातील जीन्सी पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या जीन्सी चौक परिसरात AIMIM ची माजी खासदार आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचे नेतृत्वात निघालेल्या निवडणूक प्रचार रॅलीदरम्यान मोठा गोंधळ झाल्याची घटना दि. ७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १.१५ वाजता घडली. या प्रकरणी पोलीस स्टेशन जीन्सी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १०/२०२६ अन्वये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची तक्रार पोलीस स्टेशन जीन्सी येथे गोपनीय काम पाहणारे पोलीस अंमलदार शेख शफीक यांनी दिली असून, त्यांनी आपल्या तक्रारीत संपूर्ण घटनेचा सविस्तर तपशील नमूद केला आहे.
तक्रारीनुसार, AIMIM पक्षाचे प्रभाग क्रमांक १४ मधील महापालिका उमेदवार फिरोज खान, मुनशी भिकन शेख व अलमास अमजद खान यांच्या नेतृत्वाखाली सकाळी सुमारे १०.०० वाजता प्रचार रॅलीला सुरुवात झाली होती. ही रॅली विविध मार्गांनी पुढे जात असताना दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास जीन्सी चौकात पोहोचली.
दरम्यान, याच ठिकाणी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे कलीम कुरेशी, हबीब कुरेशी, शकील कुरेशी, ओवेज शकील कुरेशी, शफिक कुरेशी, गफ्फार कुरेशी, अमान कलीम कुरेशी, शोएब सलीम पटेल, फरहान, सईद शमीम सय्यद, हुजेफ हनीफ कुरेशी, सलीम वसीम शेख, सलीम अब्बास कुरेशी यांच्यासह इतर ४० ते ५० अनोळखी कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रचार रॅली अडवली.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, संबंधित आरोपींनी घोषणाबाजी, शिवीगाळ, धक्काबुक्की व हातापायी करत रॅलीतील नागरिकांना तसेच पोलिसांना अडथळा निर्माण केला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदारांनी जमावाला शांततेचे आवाहन केले. मात्र, आरोपी अधिक आक्रमक होत असल्याने सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली.
या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला.
या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम 132, 189(2), 190, 191(2), 126(2), 115(2), 352, 351(2) व 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा दि. ७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता अधिकृतपणे नोंदविण्यात आला असून, पुढील तपास जीन्सी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. आरोपींची संख्या मोठी असल्याने इतर अनोळखी आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.