“कानिफनाथ मंदिर” नव्हे ; तर “बाबा रमजान दर्गा व मस्जिदच” !: सुप्रीम कोर्ट

“कानिफनाथ मंदिर” नव्हे ; तर “बाबा रमजान दर्गा व मस्जिदच” !: सुप्रीम कोर्ट

औरंगाबाद, (प्रतिनिधी) दर्गा बाबा रमजान, मस्जिद व कब्रस्तान ही वक्फ संस्था नसून कानिफनाथ मंदिर (कानोबा देव) असल्याचा दावा करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांनी फेटाळली. तसेच सदरील धार्मिक स्थळ हे वक्फ संस्था असल्याचे महाराष्ट्र वक्फ न्यायधिकरण आणि औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. याप्रकरणी मुतवल्ली व वक्फ संसथेच्या वतीने ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड इर्शाद हनिफ आणि औरंगाबादचे  ॲड सईद शेख यांनी बाजु मांडली.

          सन 2004 मध्ये दर्गा बाबा रमजान, मस्जिद व कब्रस्तान, शिरपुर (गात), ता. शिरुर कासार, जि.बीड चे मुतवल्ली / इनामदार शेख रहिमोद्दीन कठाडु यांनी महाराष्ट्र वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद येथे वक्फची मालकी घेषित करणे व कायम मनाई हुकुमासाठी वक्फ दावा दाखल केला होता. ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की अनेक शतकांपासून वर नमुद दर्गा, मस्जिद व कब्रस्तान अस्तित्वात आहे. सदरील वक्फ संस्थेची सेवा त्यांचे परिवार वंशपरंपरेने करीत आहे. वक्फ संस्थेच्या सेवेसाठी सर्व्हे क्रं. 22 आणि 25 (नवीन गट क्रं. 101 अ आणि 101 ब) मध्ये एकूण 61 एकर 23 गुंठे जमीन ‘सशर्त सेवा इनाम’ म्हणून बहाल आहे. ज्याची नोंद सन 1932-33 (1342 फसली) पासून अभिलेखात आहे. यासंदर्भात 1978 च्या महाराष्ट्र शासनाच्या वक्फ राजपत्र व इतर महसुल अभिलेखातही नोंदी आहेत. परंतु कोणत्याही आधारविना दिनांक 17.07.1957 च्या फेरफार अन्वये सदरील वक्फ संस्थेच्या महसुल रेकॉर्डवरील इनामदारांचे नाव कमी करून कानिफनाथ मंदीर म्हणून बेकायदेशीररित्या नोंद घेण्यात आली होती. याच नोंदीचा गैरफायदा घेत प्रतिवादी बबन नारायण गात व इतर लोकांनी वक्फ संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये अडथळे निर्माण करून वक्फ संस्था व मालमत्तेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. 

          याप्रकरणात प्रतिवादींच्या वतीनेही बाजु मांडण्यात आली. परंतु सर्व साक्षी-पुराव्यांचे अवलोकन केल्यानंतर दिनांक 31.03.2012 रोजी न्यायाधिकरणाने इनामदारचा दावा मंजुर करून सदरील मालमत्ता वक्फ असल्याचे घोषित करीत प्रतिवादींना कायम मनाईचा निर्णय दिला.

         सदरील न्यायाधिकरणाच्या निर्णयास प्रतिवादींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. मात्र दिनांक 09.04.2014 रोजी खंडपीठाचे न्यायमूर्ती टी व्ही नलावडे यांनी याप्रकरणी सविस्तर निर्णय पारित करीत न्यायधिकरणाचा वक्फच्या बाजुने दिलेला निणर्य कायम ठेवला. 

         यावर मंदीर पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करीत पुन्हा आव्हान दिले. परंतु वक्फ संस्थेच्या वतीने एओआर इर्शाद हनीफ व ॲड सईद शेख यांनी केलेले युक्तिवाद तसेच सर्व पुराव्यांचे बारकाईने निरीक्षण केल्यानंतर ‘खंडपीठाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी याचिकेमध्ये कोणतेही तथ्य नाही’ असे नमुद करीत सर्वोच्च न्यायालयाने मंदीर पक्षाची याचिका फेटाळून लावली.  j

           याप्रकरणी दर्गा बाबा रमजान, मस्जिद व कब्रस्तानच्या वतीने ॲड. इर्शाद हनिफ, एड. सईद शेख आदींनी काम पाहिले.